हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.

महिला दिनाच्या आठवडय़ात आम्ही माध्यमातली ‘ती’ या नावाने मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमधल्या स्त्रियांच्या प्रतिमांविषयी लिहिलं होतं. या स्त्री प्रतिमा कालानुरूप बदलल्या खऱ्या पण त्या खरंच कालसुसंगत वाटताहेत का? या मालिका आणि जाहिरातीमधल्या तरुण मुलींशी तुम्ही रिलेट करू शकता का, हा खरा प्रश्न आहे. काही जाहिरातींमधून नव्या युगातल्या स्त्रीची बदलती मानसिकता छान टिपली जाते, तर काही जाहिरातींमधून मात्र तिच्यातल्या सुपर वुमनलाच पुन:पुन्हा साद घातली जाते. काही मालिकांमधल्या तरुण स्त्री व्यक्तिरेखा आपल्यातल्याच वाटतात. तर काही मालिकांमध्ये मात्र मेक-अप आणि दागिन्यांनी लगडलेली तद्दन दिखाऊ पात्र दिसतात. मालिकांमधले स्त्रियांचे घरगुती संघर्ष कुरापती किंवा कट-कारस्थान स्तरात मोडणारं असतं. तरीही याला छेद देत काही मालिका मात्र वेगळेपणामुळे लक्षात राहतात. माध्यमातील ‘ती’ या विषयावर अनेकींनी आपली मतं पोस्ट केली. मालिका आणि जाहिरातींमध्ये दाखवण्यात येणाऱ्या स्त्रीप्रतिमा, त्यांचा खरे-खोटेपणा नि त्यांची कालसुसंगती आदी मुद्दे यात मांडण्यात आले.
  काहींनी मालिका पाहत असलो तरी त्या सीरियसली घेत नाही, टाइमपास म्हणून बघतो, असं लिहिलंय तर काहींनी मालिका अजूनही जुन्या काळातच वावरत असल्याचं म्हटलंय. २१ व्या शतकात जग एकीकडे चाललंय आणि आपल्या मालिका आणि त्यातल्या स्त्रिया विरुद्ध दिशेला, असंही काहींना वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया इथं प्रसिद्ध करत आहोत.

 
मंजिरी सराफ
‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’बद्दल सांगायचं झालं, तर काही गोष्टी कधी कधी पटतात, कधी कधी पटतंही नाहीत, पण आपल्याला ओमचं म्हणणं पटवून घ्यायलाच हवं. ओमची आई कर्तृत्ववान, स्वावलंबी, करिअर ओरिएंटेड असली तरी तिची दु:खं मात्र तिनं स्वत:जवळच कवटाळून घेतलेली दिसताहेत.. तिच्या ओमपेक्षा.. दुसरी मालिका ‘होणार सून मी या घरची’मधल्या कर्तृत्ववान अशा आईआज्जींनी स्वत:च्या हिकमतीनं गोखले गृहउद्योग लहानाचा मोठा केला खरा, पण आपल्या स्वत:च्या मुलांना लहानाचं मोठं करताना त्या कुठं तरी चुकल्या असं वाटतं.

श्रेया ओवळेकर
आजकाल बहुतेक मालिकांमधून स्त्री म्हणजे घराण्याची इज्जत वगरे म्हणूनच दाखविली जाते. कुठल्याही मालिकेमध्ये स्त्री नोकरी करताना, शिकताना दाखवलीच तरी ती स्वप्न पाहते ते तिच्या लग्नाचंच! स्त्रीला करिअर करताना दाखवलं जातच नाही. आज खऱ्याखुऱ्या जगातल्या बायका पुढं गेल्या आहेत तरी मालिकांमधली स्त्री मागच्या काळातच आहे. इथं कोणतीही स्त्री सीईओ किंवा इतर मोठय़ा पदावर दिसणार नाही, जास्तीत जास्त बॉसची पर्सनल सेक्रेटरी किंवा अशीच छोटी कामं करणारी. मालिकेतून दाखवल्या जाणाऱ्या स्त्रियांसारख्या आजच्या स्त्रिया नक्कीच नाहीत. मालिका बघताना आपण २०१४ मध्ये आहोत, असं जाणवतच नाही.

प्रियदर्शनी दीक्षित
सध्याच्या मालिकांमधील बऱ्याचशा स्त्री व्यक्तिरेखा खूप सोशिक नाहीतर बावळट अशा दाखवल्या जातात. तसंच मालिकांत दाखवतात तशी सतत कारस्थानं वगरे कुणीही करत नाहीत. त्यामुळं हे फारसं रियालिस्टिक वाटत नाही. करिअरवाइज जे दाखवतायत ते ओके. पण ‘दिया और बाती हम’मधली ‘ती’ घरी श्यामळू नि बाहेर करिअर करणारी दाखवतायत, ते पटत नाही. ‘होणार सून..’मधली जान्हवी त्यातल्या त्यात ठीक वाटते. ‘राधा’ तर अगदी बावळट दाखवली होती. ‘गंध फुलांचा’मध्ये दाखवल्याप्रमाणं नवऱ्याला दुसरी बायको करून देणं, कसं शक्य आहे? ‘कल्याणी’मध्येही काही खरं वाटण्यासारखं नसतंच. बायको हरवली म्हणून दुसरं लग्न करून देताहेत, हे काय आहे? कसंही नि काहीही दाखवून प्रेक्षकांना गृहीत धरणं चुकीचं आहे.

केतकी जोशी
मी फक्त लिमिटेड मालिकाच बघते. त्यातही ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका आवडीनं बघते. यातल्या सातही जणींचा अभिनय आवडत असला तरी जान्हवीची भूमिका फार आवडते. तिनं सासरी गेल्यावर आपला स्वभाव, वागणं नि कृतीनं आईआज्जीसकट सर्व कुटुंबाला जिंकलंय. जान्हवी सासरप्रमाणं माहेरच्या मंडळींनाही तितकंच सांभाळून घेत्येय. आजच्या जमान्यातल्या मुली घर नि करिअर या दोन्ही आघाडय़ा व्यवस्थितपणं सांभाळू शकतात, हे वास्तवही या मालिकेतून दिसतंय. त्याच त्या पात्रं नि कथानकांभोवती फिरणाऱ्या मालिकांपेक्षा ही थोडी वेगळी मालिका आहे.

प्रीती दुबे
काही मालिकांतल्या घटना काही वेळा खरंच प्रत्यक्षात घडलेल्या असतात. पण वाटेल तसं पुन्हा लग्न लावणं वगरे गोष्टी प्रत्यक्षात घडताना पाहिलेल्या नाहीत. या मालिकांमधली अनेक वुमन कॅरॅक्टर्स सगळं सहन करणारी दाखवली जातात, ते चुकीचं आहे. रियालिस्टिक नाहीये. आजची स्त्री सोशिक नाहीये. एवढं टॉर्चर ती सहन करणार नाही. ‘बालिकावधू’मधली आनंदी करत असलेली समाजसेवा वास्तवाला धरून वाटते. आपल्यासारख्या चार जणींना मदत करणं, असं होऊ शकतं. ‘दिया और बाती हम’मधल्या ‘तिला’ आयपीएस ऑफिसर व्हायचंय पण ‘तिला’ शिक्षण घेण्याच्याबाबतीत फॅमिली प्रेशर आहे. ‘तिला’ डॉमिनेट केलं जातंय. ते रियालिस्टिक वाटतं.

मनीषा टोपले
मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या बऱ्याचशा स्त्रीप्रतिमा या एकदम चांगल्या किंवा वाईट अशा दोन टोकांच्या असतात. त्यात ग्रे किंवा वास्तववादी रंग नसतोच. नवरा, त्याचं अफेअर, सासू अशाच चक्रात अडकलेली ही पात्रं स्वतला ‘चांगली सून’ म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न करतात. त्यांच्या भरजरी पोशाखाबद्दल न बोललेलंच बरं. आजच्या शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टय़ा सेटल झालेल्या आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्त्रीची काही अंशी तरी रियलिस्टिक प्रतिमा दाखवायला काय हरकत आहे? सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असणाऱ्या स्त्रीची छबी आता ‘शोकेसमधली बाहुली’ अशी उरलेली नाहीये. पण मनोरंजन क्षेत्र मात्र आपली जुनी पठडी चटकन सोडायला तयार नाहीये. आजच्या स्त्रीची प्रतिमा अंशत: तरी प्रतििबबित होणारी एखादी मालिका आपल्याला पाहायला मिळेल, अशी आशा करते.
तुम्ही लेखात उल्लेख केलेली ‘तनिष्क’ची जाहिरात मलाही आवडली. त्यासंबंधी माझं एक निरीक्षण म्हणजे ती वधू गोरीपान नव्हती. कारण एरवीच्या जाहिरातींमध्ये बऱ्याचदा गोऱ्या-सुंदर मुलीच दाखवल्या जातात. कुणाचा रंग त्याच्या-तिच्या ध्येयप्राप्तीत कशी काय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो? पण हे मुद्दे मनोरंजन क्षेत्रानं विचारात घेईपर्यंत आपल्या हाती फक्त ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ एवढंच उरतं.