scorecardresearch

Premium

‘इनर्स’विषयी बोलू काही

गेल्या काही वर्षांपासून ‘शेपवेअर’ हा प्रकार भारतात रुजू पाहतोय.

‘इनर्स’विषयी बोलू काही

आपल्याकडे कित्येक गोष्टींबाबत असं होतं.. त्या गरजेच्या तर असतात, पण चारचौघांत त्यांच्याविषयी बोलायला मात्र कोणीच तयार नसतं. इनरवेअर, शेपवेअर हेही याच गटात मोडणारे सदस्य. मुलगी वयात येताच ‘ब्रा’ तिच्या आयुष्यात येते. ब्रेसिअर घट्ट बसते, घामाने रॅश येतात म्हणून ती नकोशी वाटत असली तरी ती गरजेची असतेच. प्रत्येक मुलीची पहिली ब्रा आईच्या मदतीने घेतली जाते. त्यानंतर कित्येक र्वष एकाच प्रकारची ब्रा बऱ्याच मुली वापरत असतात. साईझच्या निवडीतसुद्धा अज्ञानामुळे काही चुका होतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. गेल्या काही वर्षांपासून ‘शेपवेअर’ हा प्रकार भारतात रुजू पाहतोय. ड्रेसच्या आत कोणतं ‘इनर’, कोणती ‘स्लिप’ घालावी, याचीही निवड कित्येकींची चुकते. अजूनही भारतात बहुतांश मुली काळ्या आणि पांढऱ्या स्लिपवर अवलंबून असतात. ड्रेसमध्ये तर भरपूर व्हरायटी दिसायला लागली आहे. पण वेगवेगळ्या फॅशनच्या ड्रेसच्या गरजा वेगवेगळ्या इनर्सच्या असतात. याबाबत अज्ञानामुळे किंवा बेफिकिरीमुळे कित्येकदा तुमच्याही नकळत काही ड्रेसेसमध्ये फसगत होते आणि ही बाब लोकांच्या नजरेतून सुटत नाही. पण अगदी जवळच्या मैत्रिणी, बहिणी यांच्यामध्येही याबद्दल संवाद होत नाही. त्यामुळे अशा वेळी विशिष्ट प्रकारचा, रंगाचा ड्रेस, घालायचा नाही.. हा तात्पुरता पर्याय निवडला जातो. हे टाळायचं असेल तर इनरवेअर, शेपवेअरबाबतचा ‘टॅबू’ मोडून त्यांच्याबद्दल मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे.

सुरुवात सगळ्यात जिव्हाळ्याच्या ब्रापासूनच करू या. कॉटन ब्रा ही प्रत्येक मुलीच्या माहितीची आणि गरजेची. रोजच्या वापरासाठी सुटसुटीत कॉटन ब्रा कित्येक मुली वापरतात. पण ब्रा आणि ड्रेसचा रंग जुळून येईल, हे पाहणं गरजेचं असतं. बऱ्याचदा विशिष्ट रंगाचं इनर नसल्यास काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा पर्याय वापरला जातो. पण पांढऱ्या रंगाचे इनर प्रकाशात दिसून येते. न्यूड रंगाचे इनर तुम्हाला याबाबत कधीच दगा देत नाही. इनरचा प्रकार कोणताही असो, न्यूड रंगाचे इनर सर्व रंगांसोबत वापरता येतं.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

ब्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या गरजेनुसार काही प्रसंगांत योग्य प्रकारची ब्रा निवडणं गरजेचं असतं. कॉटन ब्रामध्ये कप्स नसतील, तर त्याला चुण्या पडतात. फिटेड ड्रेस ब्राला चिटकून बसल्याने या क्रीझ त्यावर स्पष्ट दिसतात. अशा ड्रेससाठी कप्स असलेली पॅडेड ब्रा वापरावी. जिममध्येसुद्धा घामामुळे कॉटन ब्रा नकोशी वाटते. अशा वेळी ‘रेसर ब्रा’ किंवा ‘स्पोर्ट्स ब्रा’ वापरता येतात. स्ट्रॅपलेस किंवा स्पगेटी स्ट्रॅप ड्रेस असल्यावर ब्रा घालताना अडचणी येतात. यावर पर्याय म्हणून ट्रान्स्परंट स्ट्रॅपच्या ब्रा मध्यंतरी बाजारात आलेल्या. पण त्याही दिसायला विचित्र दिसतात. त्याऐवजी ‘स्ट्रॅपलेस ब्रा’ वापरू शकता. हॉल्टरनेक, बॅकलेस, वन शोल्डर ड्रेस घालताना गळ्याच्या आकारानुसार ब्राची स्ट्रॅप आत लपणं गरजेचं असतं. अशा वेळी ‘कन्व्हर्टेबल’ किंवा ‘मल्टीवे ब्रा’ वापरता येतात. याशिवाय तुमच्या ब्रेस्टच्या आकारानुसार ‘पुश-अप ब्रा’, ‘फुल कव्हर ब्रा’ अशा विविध प्रकारच्या ब्रा बाजारात उपलब्ध आहेत.

आपल्याकडे पारदर्शी ड्रेसच्या आत इनर घातलं जातं. याचंच पुढचं पाऊल म्हणजे ‘शेपवेअर’. शेपवेअर अंगाला घट्ट बसतात, त्यामुळे पोटाची घेरी, कमरेचा आणि मांडय़ांचा लठ्ठपणा काही प्रमाणात लपवणं शक्य होतं. यामध्येही वेगवेगळ्या गरजेनुसार प्रकार आहेत. ‘फुल बॉडी शेपर’ हा नावाप्रमाणे एखाद्या बॉडीसूटप्रमाणे असतो. मॅक्सी ड्रेस, गाऊनसोबत हा शेपर वापरता येतो. हा संपूर्ण शरीराला एक आकार देतो. शॉर्ट ड्रेससोबत वापरायला सोयीचे असे वेगेवगेळ्या साइजमध्येही शेपर उपलब्ध आहेत. अपर बॉडीसाठी ‘केमी शेपर’ असतात, तर कंबर आणि हिप्ससाठी ‘ब्रीफशेपर’ असतात. ड्रेसच्या लांबीप्रमाणे वेगवेगळ्या लांबीचे ‘थायशेपर’ आणि ‘लेगिंगशेपर’सुद्धा बाजारात आले आहेत. साडीचा परकर घेरदार असतो, त्यामुळे बऱ्याचदा साडीत काही मुली जाड दिसतात. परकराला पर्याय म्हणून ‘साडीशेपर’सुद्धा वापरता येतो. ‘इनर्स’चे विविध पर्याय सध्या बाजारात उपलब्ध असले, तरी ते वापरायचे कसे, हेही तितकचं महत्त्वाचं आहे.

  • शेपर्सचं मुख्य काम तुमच्या शरीराला विशिष्ट वळण देणं हे आहे. त्यामुळे तुमच्या शर्टच्या साईजनुसार योग्य शेपर निवडा. बऱ्याचदा मुली बारीक दिसण्यासाठी एक साईज कमीचा शेपर वापरतात. पण त्यामुळे त्रास होऊ शकतो.
  • वन पीस ड्रेस, स्कर्टसोबत थाय शेपर वापरणे उत्तम. वावरताना अवघडलेपणा येणार नाही.
  • शेपरचं कापड तपासून घ्या. नायलॉनच्या शेपरमध्ये घाम जास्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे इनडोअर पार्टीसाठी असे शेपर ठीक, पण प्रवासाच्या वेळी कॉटन ब्लेंडचे कापड निवडा.
  • शेपर हा ठरावीक वेळेसाठी वापरायचा असतो. रोज पूर्णवेळ ऑफिस, कॉलेजमध्ये वापरल्यास त्याचा त्रास होऊ शकतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व Wearहौस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to choose perfect innerwear

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×