शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारी नेण्याच्या उद्देशाने लातुरात आयोजित धान्य महोत्सवास लातूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत जवळपास २ हजार क्विंटल मालाची विक्री होऊन यातून दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, संचालक आत्मा व पणन मंडळाच्या वतीने १ ते ३ मे या कालावधीत लातूर शहरातील टाऊन हॉल येथे या महोत्सवाचे आयोजन केले होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. महापौर स्मिता खानापुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, कृषी सहसंचालक के. एन. देशमुख, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संतोष देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी. एस. मोटे आदी उपस्थित होते. महोत्सवात १७० ते १८० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. जवळपास ५५ स्टॉल्स उभारण्यात आले. महोत्सवाची शुक्रवारी सांगता झाली.
धान्याच्या पॅकिंगसाठी मोफत पोते विभागाकडून पुरवण्यात येत होते. विभागाच्या वतीने जवळपास १० हजार रिकाम्या पोत्यांचे नियोजन शेतकऱ्यांसाठी करण्यात आले. महोत्सवात विक्रीसाठी ठेवलेले धान्य विश्वासाने व रास्त भावात मिळत असल्याने ग्राहकांचा खरेदीस उदंड प्रतिसाद मिळाला.