जिल्ह्यात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वनहक्कांची मान्यता अधिनियमांतर्गत दाखल होऊन उपविभागीय स्तरावरील समित्यांनी नामंजूर केलेल्या ३१,५३४ दाव्यांपैकी १२ हजार ३२७ दावेदारांनी जिल्हास्तरीय समितीकडे अपील केले नसल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे उपरोक्त प्रकरणाबाबत अंतिम निर्णयही झालेला नाही. संबंधितांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे असल्यास ते सादर करावेत असे आवाहन जिल्हास्तरीय वनहक्क समितीने केले आहे.
वनहक्क कायद्यानुसार जिल्ह्यात एकूण ५० हजार ३८४ दावेदारांनी वनहक्क समित्यांकडे दावे सादर केले होते. त्यापैकी उपविभागस्तरीय समित्यांनी १८ हजार १७६ दावे नामंजूर केले होते.
नामंजूर केलेल्या ३१ हजार ५३४ दाव्यांपैकी १९२०९ दावेदारांनी जिल्हास्तरीय समितीकडे अपील दाखल केले आहे. मात्र, अद्याप उर्वरित १२ हजार ३२७ दावेदारांनी अपील दाखल केलेले नाही. या दावेदारांकडे त्यासाठी पाठपुरावा करण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागत आहे.
ज्या दावेदारांनी उपविभाग स्तरीय समितीने नामंजूर केलेल्या वनहक्क दाव्यांबाबत अपील केले नसल्याने त्यांच्या दाव्यात अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे उपविभागस्तरीय समितीने नामंजूर केलेल्या दावेदारांनी त्यांच्याकडे समर्थनार्थ पुरावे असल्यास त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी पुराव्यासह आपले म्हणणे मांडण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हास्तरीय वनहक्क समितीने केले आहे.