नेकनूर (तालुका बीड) येथील सराफी दुकानाचे शटर तोडून चोरटय़ांनी जवळपास १२ लाखांचे दागिने लांबवले.
गावच्या व्यापारपेठेत आतार गल्लीत सुजित अमरापूरकर नाईक यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दुकान बंद करून नाईक घरी गेले. मध्यरात्री केव्हा तरी चोरटय़ांनी शटरचे कुलूप तोडून दुकानातील सोन्या-चांदीचे १२ लाखांचे दागिने लांबवले. चोरी झाल्याचे बुधवारी सकाळी दुकानमालकाच्या लक्षात आले. त्यांनी नेकनूर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून श्वानपथक बोलविले. मात्र, सायंकाळपर्यंत तपास लागू शकला नव्हता. जिल्हा सराफ असोसिएशन संघटनेने पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून वाढत्या चोऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली.