News Flash

श्रीरामपूरचे १२० यात्रेकरू उत्तराखंडात अडकले

उत्तराखंडात झालेल्या ढगफुटीमुळे केदारनाथ यात्रेसाठी शहरातील प्रवासी कंपनीने नेलेले १२० यात्रेकरू हरिद्वारपासून शंभर किलोमीटर असलेल्या गौरीकुंडानजीक अडकले असून, त्यांचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला आहे.

| June 19, 2013 01:55 am

उत्तराखंडात झालेल्या ढगफुटीमुळे केदारनाथ यात्रेसाठी शहरातील प्रवासी कंपनीने नेलेले १२० यात्रेकरू हरिद्वारपासून शंभर किलोमीटर असलेल्या गौरीकुंडानजीक अडकले असून, त्यांचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. स्वतंत्ररीत्या गेलेले १० यात्रेकरू सुखरुप असून ते परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
शहरातील आनंद कुलकर्णी यांचे अंबिका ट्रॅव्हल्स ही प्रवासी कंपनी असून दरवर्षी चारधाम यात्रेला भाविकांना घेऊन जातात. यंदा गेल्या दि. ५ रोजी १२० यात्रेकरूंना घेऊन ते गेले होते. औरंगाबाद, पैठण, परभणी, नांदेड या भागातील भाविकांचा भरणा असून स्वत: कंपनीचे मालक आनंद कुलकर्णी त्यांच्या पत्नी शीतल व मुलगा शेखर यांचा त्यामध्ये समावेश आहे. गौरीकुंड या गावात पोहोचल्यानंतर त्यांनी एका लॉजमध्ये मुक्काम केला. पण ढगफुटीमुळे लॉज रिकामे करण्यात आले. सुरक्षा जवानांनी त्यांना शेजारच्या गावात हलविले. कुलकर्णी यांनी त्यांचे चिरंजीव धनंजय यांना दूरध्वनी करून आम्ही सुरक्षित आहोत, असे तीन दिवसांपूर्वी कळविले होते. पण त्यानंतर मात्र दूरध्वनी आला नाही. त्यांचा संपर्क तुटला आहे. दोन दिवसांत उत्तराखंडात पावसाने पुन्हा थैमान घातले असून त्यात हे प्रवासी अडकले आहेत.
पंधरा दिवस आधीच पाऊस आल्याने प्रवासी कंपन्यांचे नियोजन या वेळी चुकले. दरवर्षी पाऊस होतो, नद्यांना थोडाफार पूर येतो. पण सुरक्षा जवान ४-५ तासांत रस्ता मोकळा करतात. पण या वेळी ढगफुटी होऊन अलकनंदा व मंदाकिनी नद्यांना पूर आला असे कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले.
शहरातील व्यापारी कल्याणमल भाऊलाल चुडीवाल (वय ७५) त्यांच्या पत्नी शांताबाई (वय ७०), कल्पना अनिल सेठी (वय ४८), कांचनबाई कासलीवाल (वय ६०), सत्यम राजेंद्र पाटणी (वय १७), अक्षय संतोष कासलीवाल (वय १२), उद्योजक सतोबा राऊत (वय ६०), त्यांच्या पत्नी लक्ष्मी (वय ५५), अतुल अनिल कासलीवाल (वय १८) हे केदारेश्वरला दर्शनासाठी गेले होते. हरिद्वारहून केदारनाथकडे जात असताना देवप्रयागजवळ ते अडकले. ४८ तास त्यांना एकाच ठिकाणी थांबून राहावे लागले. यात्रा पूर्ण न करता ते आता माघारी निघाले आहेत. हरिद्वारपासून १०० किलोमीटर अंतरावर देवप्रयागनजीक त्यांनी ढगफुटी व पुराचा अनुभव घेतला. त्यांच्या गाडीच्या पुढील मोटारीवर दरड कोसळली, सुदैवाने चुडीवाल व त्यांचे सहकारी बचावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 1:55 am

Web Title: 120 shrirampur pilgrims stranded near uttarakhand
Next Stories
1 युवकाच्या खूनप्रकरणी आईसह तिघांना अटक
2 सोलापूर जिल्हय़ात मृग नक्षत्राने पाठ फिरविली
3 प्रशासनाचे अतिवृष्टी व संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष-शंभूराज देसाई
Just Now!
X