परभणी जिल्हा परिषदेच्या भारत अभियानांतर्गत ११ एप्रिल रोजी जिल्हय़ातील १३४ ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेची गुढी उभारण्यात येणार आहे. याबरोबरच प्रत्येक गावात १० शौचालयांच्या बांधकामाचा प्रारंभ गुढीपाडव्यानिमित्त करण्यात येणार आहे.
निर्मल भारत अभियानाच्या २०१३-१४च्या वार्षिक आराखडय़ात जिल्हय़ातील १३४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १५, जिंतूर १३, मानवत १२, परभणी १९, पालम १४, पाथरी १४, पूर्णा १६, सेलू १५, सोनपेठ १६ गावांचा समावेश आहे. जिल्हय़ातील निर्मल भारत अभियानात पायाभूत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यां, महिला बचतगटाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीवर स्वच्छतेची गुढी उभारून चालू वर्षांत पाणंदमुक्त, निर्मल करण्याचा संकल्प सोडण्यात येणार आहे.
शुक्रवारी (दि. १२) निवडलेल्या ग्रामपंचायतीच्या गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छतेची गुढी उभारून या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
अंगणवाडी केंद्रात हळदी-कुंकवाचा विशेष कार्यक्रम घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. पंचायत समिती, गटशिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना स्वच्छता गुढी उभारण्याप्रसंगी जिल्हा परिषदेतर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. नववर्षांत ग्रामस्थांनी गाव पाणंदमुक्त व निर्मल करण्याचा नव संकल्प करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री व एन. व्ही. करडखेलकर यांनी केले आहे.