सोलापूर शहरात गुरुवारी पहाटे चोरटय़ांनी एकाच वेळी भरचौकातील तीन मोठी दुकाने फोडून उंच्या किमतीचे मोबाइल संच व नामवंत कंपनीचे चप्पल-बूट लांबविले. चोरीला गेलेल्या मालाची किंमत सुमारे १५ लाखांपर्यंत आहे. दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असूनदेखील त्यावर शक्कल लढवत चोरटय़ांनी स्वत:चे चेहरे ओळखू येऊ नयेत म्हणून तोंडावर काळे पट्टे रंगविलेले दिसून येतात. हाताचे ठसे मिळू नयेत म्हणून चोरटय़ांनी हातमोजांचा वापर करण्याची खबरदारीही घेतल्याचे दिसून येते. सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनदेखील त्याचा उपयोग गुन्हय़ाची उकल होण्यासाठी होणे अशक्य असल्याने चोरटय़ांनी सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.
जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील शिवप्रकाश ऊर्फ बाबुराव चव्हाण यांच्या मालकीचे चव्हाण ट्रेडिंग कंपनी या नावाने सॅमसंग कंपनीचे शोरूम आहे. तसेच पार्क चौकातील चार्टर्ड अकौंटंट दिलीप अत्रे यांच्या भागीदारीतील अत्रे असोसिएट्स या नावानेदेखील सॅमसंग कंपनीचे शोरूम आहे. चव्हाण ट्रेडिंग कंपनीचे शोरूम सकाळी उघडताच अज्ञात चोरटय़ांनी शोरूम फोडून मोबाइल संच लंपास केल्याचे दिसून आले. त्याच वेळी अत्रे असोसिएट्सचेही शोरूम फोडल्याचे पाहावयास मिळाले. या दोन्ही शोरूमच्या शिवाय जुन्या एम्प्लॉयमेंट चौकात पंधे संकुलात सिटी हॉस्पिटलशेजारी असलेले चप्पल-बूट विक्रीचे वूडलँड शोरूम हे दुकानदेखील चोरटय़ांनी फोडल्याचे दिसून आले. पहाटे साडेचार ते पावणे पाचच्या सुमारास ही तिन्ही दुकाने फोडण्यात आली.
चव्हाण ट्रेडिंग कंपनीच्या शोरूममध्ये आत व बाहेर मिळून सहा सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच शोरूममध्ये मोबाइल संच ठेवलेल्या कपाटांमध्ये सायरनची देखील यंत्रणा आहे. दुकान बंद केल्यानंतर चोरटय़ांनी दुकानात येऊन मोबाइल संच चोरण्याचा प्रयत्न केल्यास तेथील सायरन लगेच वाजते. एवढी मजबूत सुरक्षा यंत्रणा असताना अंगात पांढरा पोशाख घातलेले दोघे चोरटे पहाटे ४.४० वाजता या शोरूमचे शटर तोडून आत घुसले. चोरटय़ांनी सीसीटीव्ही कॅमे-यात स्वत:चे चेहरे बंदिस्त होऊ नये तसेच स्वत:च्या हातांचे ठसे मिळू नयेत म्हणून क्रिकेट खेळाडूंप्रमाणे चेह-यांवर काळे पट्टे रंगविले होते. हातांचे ठसे न मिळण्यासाठी हातमोजे परिधान केल्याचेही दिसून येते. चोरटय़ांनी या शोरूमधून अत्रे असोसिएट्स शोरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु ते बंद असल्याने चोरटय़ांचे चेहरे कैद होऊ शकले नाहीत. या दुकानातून चोरटय़ांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे मोबाइल संच लांबविले. तर चव्हाण ट्रेडिंग कंपनीच्या शोरूममधून सुमारे दहा लाखांचे मोबाइल संच लंपास करताना तेथील सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये चोरटय़ांचे सर्व प्रताप दिसून आले तरी त्यांचे चेहरे काळय़ा पट्टय़ांनी झाकले गेल्याने सीसीटीव्ही कॅमे-यांची सुरक्षेच्या संदर्भातील उपयुक्ततेला आव्हान मिळाल्याचे दिसून येते. वूडलँड शो रूममधून चोरटय़ांनी किती ऐवज चोरून नेला, त्याचा तपशील सायंकाळी उशिरापर्यंत मिळू शकला नाही. मात्र या तिन्ही चो-या एकाच टोळीने केल्या असण्याचा अंदाज पोलीससूत्रांनी वर्तविला आहे.