दिल्ली दरवाजा, तसेच सावेडी येथे दोन वेगवेगळी दुकाने फोडून झालेल्या चोरीत एकूण १६ लाखांचा ऐवज पळवण्यात आला. एकात साडेनऊ लाख रूपयांचे दागिने गेले, तर दुसऱ्यात साडेसहा लाख रूपयांचे लॅपटॉप लंपास करण्यात आले. दुकानाचे शटर उचकटण्याची पद्धत लक्षात घेता दोन्ही चोऱ्या एकाच टोळीने केल्या असाव्यात, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दिल्ली दरवाजा येथे संजय रामदास सातपुते यांचे गोल्डन ज्वेलरी नावाचे दुकान आहे. चोरटय़ांनी रात्री हे दुकान फोडले. दुकानाचे शटर उचकटून त्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील ९ लाख ६६ हजार रूपयांचे दागिने व काही रोख रक्कम त्यांनी पळवली. सातपुते यांच्या सकाळी ही चोरी लक्षात आली. त्यांनी लगेचच तोफखाना पोलीस ठाणे गाठले व त्यांना घटनेची माहिती देऊन फिर्याद नोंदवली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यासह तोफखान्याचे पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे लगेचच पोलीस पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी बरोबर श्वानपथक आणले होते. त्यातील श्वानाने दुकानाच्या बाहेर काही अंतरापर्यंतच माग काढला. त्यावरून चोरटे तिथून गाडीतून पळून गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेची पोलीस माहिती घेत असतानाच सावेडी येथे असेच आणखी एक दुकान फोडले असल्याची माहिती त्यांना मिळाली. मनोज रमेश झंवर यांच्या महावीरनगर येथील दुकानातून तब्बल १५ लॅपटॉप त्यांनी काखोटीला मारले व पळ काढला. दुकानातील काही रोकडही त्यांनी लांबवली. झंवर यांनाही सकाळीच ही चोरी समजली. त्यांनीही लगेच तोफखाना पोलिसांना याबाबत कळवले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बारकुंड व पोलीस निरीक्षक तांबे यांनी याही घटनास्थळी लगोलग भेट दिली व पाहणी केली. श्वानपथक आणण्यात आले. येथेही त्यातील श्वानाने दुकानाबाहेर काही अंतरापर्यंतच माग काढला. ५ लाख ६६ हजार रूपयांचे लॅपटॉप चोरीला गेले असल्याची फिर्याद झंवर यांनी दिली.
दोन्ही चोऱ्यांचा पंचनामा वगैरे पोलिसी कारवाई दुपापर्यंत सुरू होती. दुकानांचे शटर उचकटण्याची पद्धत पाहून या चोऱ्या एकाच टोळीने एकाच गाडीतून येऊन केल्या असाव्यात, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मध्यरात्री हा प्रकार झाला असावा अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक तांबे यांनी सांगितले की काही दुवे पोलिसांच्या हातात सापडले असून त्यावरून तपास सुरू आहे. चोरटे सराईत असावेत व मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावरची दुकाने या पद्धतीने फोडून चोरी करायची व त्वरित गाडीतून पळून जायचे अशीच त्यांची पद्धत असावी असे ते म्हणाले. दरम्यान रस्त्यावरच्या दुकानांमध्ये अशा चोऱ्या होत असताना पोलिसांची रात्री गस्त घालणारी गाडी काय करत असते असा प्रश्न दुकानदारांकडून उपस्थित केला जात आहे. रात्रीची गस्तच घातली जात नाही, त्यामुळेच चोरटय़ांचे फावते आहे असे दुकानदारांचे म्हणणे आहे.