महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. डी. पठाण यांना शनिवारी ३० हजारांची लाच घेतना अटक करण्यात आली. त्यांच्या घरावर छापा टाकून घेतलेल्या झडतीत आज १ कोटी १९ लाख रुपये रोख आढळून आले आहेत. अजूनही झडतीचे काम सुरू आहे. एवढी बेहिशेबी रक्कम जमवली कशी याचा शोध पोलीस घेत आहेत. नांदेड येथे ही कारवाई करण्यात आली.
नांदेड जिल्ह्य़ातील कुंडलवाडी येथील शेतकरी शेख खलीफ यांनी वक्फ बोर्डाची १ एकर जमीन २० हजार रुपये देऊन भाडेतत्त्वावर घेतली होती. या जमिनीचा भाडेकरार संपल्यानंतर त्याला मुदतवाढ द्यावी, यासाठी शेख खलील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एन. डी. पठाण यांच्याशी संपर्क साधून मुदत वाढवून देण्याची विनंती केली. यासाठी पठाण याने सव्वा लाख रुपये लाचेची मागणी केली. यापूर्वी ५० हजार रुपये पठाण यांना देण्यात आले होते. उर्वरित रकमेपैकी ३० हजार रुपये शनिवारी देण्याचे ठरले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास शनिवारी पठाण यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. आज दिवसभर त्याच्या घराची झडती घेण्यात आली, यात १ कोटी १९ लाख रुपये आढळल्याने त्याच्या बेहिशेबी संपत्तीच्या तपासणीस आणखी दोन दिवस लागतील असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या पठाण यास न्यायालयासमोर उभे केले असता त्याला चार जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.