शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक गस्ती वाहन (पीसीआर) चोवीस तास सातही दिवस फिरणार असून पोलीस आयुक्त कौशल पाठक यांनी गुरुवारी या वाहनांना हिरवी झेंडी दाखवली. ही वाहने गस्त घालण्यासाठीच असून इतर कामासाठी नाही, असे सांगायलाही ते याप्रसंगी विसरले नाहीत.
शहर पोलिसांना गृह खात्याकडून ३२ नव्या कोऱ्या बोलेरो जीप्स प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला त्यापैकी एक जीप देण्यात आली आहे. गस्ती वाहन असे नाव या वाहनांना देण्यात आले आहे. एखादी घटना घडल्यास तात्काळ संपर्क साधण्यासाठी त्यावर दूरध्वनी क्रमांक आहेत. सहायक उपनिरीक्षक, चार शिपाई व एक चालक असे सहाजण त्यात चोवीस तास राहतील. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी ही वाहने काहीवेळ थांबतील. त्यावर उपायुक्तांचे नियंत्रण राहणार असून दरतासाने नियंत्रण कक्ष आढावा घेणार आहे. आता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल वाहनांची संख्या चार झाली आहे. सूचना मिळताच घटनास्थळी केवळ पाच ते दहा मिनिटात पोहोचावी, असेच या वाहनांचे लोकेशन राहणार आहे.
काटोल मार्गावरील पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या पोलिसांच्या मोटारवाहन कार्यशाळा परिसरात गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त कौशल पाठक, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी या वाहनांना हिरवी झेंडी दाखविली. पोलीस उपायुक्त जीवराज दाभाडे, मंगलजित सिरम, संजय दराडे, सुनील कोल्हे, राजेश जाधव, चंद्रकिशोर मीणा, कैलास कणसे, सहायक पोलीस आयुक्त गंगाराम साखरकर, ए. टी. उइके, एन. झेड. कुमरे, बाळकृष्ण पवनीकर, प्रताप धरमसी, अनंत थोरात, मारुती पवार, मोटारवाहन विभागाचे अनिल देशमुख यांच्यासह सर्व पोलीस निरीक्षक याप्रसंगी उपस्थित होते.
या सर्व वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात आली. नागपुरातील औषध विक्रेते संजयकुमार गुप्ता यांनी स्वत:हून त्या उपलब्ध करून दिल्या.
आठ वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. प्रथमोपचार न मिळाल्याने ते बेशुद्धावस्थेत केले. सुमारे तीन महिने ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर शुद्धीवर आले तेव्हा त्यांना अर्धागवायू झाला. गेल्या वर्षभरापासून ते थोडे बोलू शकतात, हिंडू फिरू शकतात. प्रथमोपचार वेळीच मिळाला असता तर मोठय़ा आजाराला तोंड द्यावे लागले नसते. ही वेळ इतरांवर येऊ नये म्हणून त्यांनी हा उपक्रम सुरू केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल व वासुदेव वांढरे यांनी सांगितले.