पनवेल तालुक्यामध्ये डोंगरालगतच्या २५ वाडय़ांना सतर्कतेचा इशारा महसूल विभागाने दिला आहे. मुसळधार पाऊस आणि डोंगरांना काही ठिकाणी भेगा गेल्याने दरड कोसळण्याच्या संभाव्य शक्यतेमुळे हा इशारा देण्यात आल्याची माहिती तहसीलदार पवन चांडक यांनी दिली. गुरुवार सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्व नाले पाण्याने तुंबले आहेत. रस्त्यावर आणि सखल भागांमध्ये पाणी घरांमध्ये भरले आहे.पनवेलच्या ग्रामीण परिसरात चिखले, वारदोली, आकुर्ली, माचीप्रबळ, वडघर, करंजाडे, ओवळे, कोळखे, पळस्पे, मोहदर, धोदाणी, खैरवाडी, कोंडले, हरिग्राम, खानाव, वाजे, चेरीवली, पिंपळवाडी, करंबळी, लाडीवली, कालीवली, साबणे, सारसाई, तळोजा (चाळ), पाले बुद्रुक या डोंगरकुशीत ही गावे वसली आहेत. या गावांना महसूल विभागाने मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने वेळीच स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हरिग्राम केवाळे येथे डोंगराच्या मध्यभागी चार कुटुंबे वास्तव्याला आहेत. आज मुसळधार पावसातही प्रशासनाने या कुटुंबांना लवकरच स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला. या स्थलांतरासाठी लागणारा खर्च सरकारी मदतीमधून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जवळचे डोंगर फोडून खडकातून ग्रीट, खडी मिळवायची असा येथील धनिकांचा व्यवसाय आहे. मात्र या डोंगरातील  वाडय़ाही याच पनवेलमध्ये अनेक वर्षांपासूनची हक्काची जागा सोडण्यास तयार नाहीत. सुरुगाच्यावेळी दगड उडण्याच्या घटना नित्याच्या असल्या तरीही तळोजा येथील चाळ आणि वळवली येथील आदिवासी कुटुंबे येथेच आपले पाय घट्ट रोवून उभी आहेत. याच कुटुंबांना भूस्खलनाचा धोका मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. पनवेलमधील अर्धवट फुटलेले डोंगर त्याशेजारील लोकवस्ती याची साक्ष देत उभे आहेत.
पनवेलच्या जमिनीला सध्या बाजारमंदीतही तीन लाख रुपये गुंठय़ाचा भाव मोजून खरेदी करणाऱ्यांची स्पर्धा सुरू आहे. पनवेलच्या ग्रामीण परिसराला डोंगररांगांचे वरदान मिळाले आहे. निसर्गाच्या कुशीत आपले फार्महाऊस असावे या स्वप्नाने अनेकांनी नेरे, वाजे, माचीप्रबळ अशा गावांच्या जंगली भागात वृक्षांची कत्तल करून स्वप्नपूर्ती केली आहे. सिडकोसारखे मोठे प्रशासनही या स्पर्धेत मागे नाही. शहरांची निर्मिती करताना नैसर्गिक पाणी निचऱ्याच्या वाटेला फाटा देत पाण्याच्या निचऱ्यासाठी अरुंद नाले येथे ठेवले आहेत. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामादरम्यान खाडीवरील कांदळवणे नष्ट करून त्यावर मातीचे भराव करणे, डोंगररांगा फोडणे आणि कांदळवणे नष्ट करणे हा त्या नैसर्गिक ऱ्हासाचा एक भाग आहे. याचा पहिला टप्पा म्हणजे पनवेलजवळील करंजाडे येथील मातीचा भराव आहे. यामुळेच पनवेल शहरातील सखल भागांमध्ये मुसळधार पावसाचे पाणी साचण्याची नवीन ठिकाणे बनली आहेत.