बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षांसाठी, वंचित व दुर्बल घटकांतील जिल्ह्य़ातील केवळ १ हजार ७४६ मुलांना २५ टक्क्य़ांप्रमाणे, पूर्व  प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने मोफत प्रवेश मिळवून दिले आहेत. मोफत प्रवेशाच्या ३ हजार ६९८ जागा अद्यापि शिक्षण संस्थांकडे रिकाम्या आहेत. जिल्ह्य़ात शाळाबाह्य़ मुलांची संख्या मोठी असतानाही मोठय़ा संख्येने प्रवेशाच्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत. नगर शहरातही रिकाम्या राहिलेल्या जागांची संख्या ८६१ इतकी आहे.
आरटीई कायद्यानुसार २५ टक्क्य़ांप्रमाणे मोफत प्रवेशाचे हे दुसरे वर्षे आहे. गेल्या वर्षीही योजनेची माहिती न मिळाल्याने वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी असलेल्या जागा रिकाम्या राहिल्या होत्या. आता यंदाही, म्हणजे सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांसाठी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात रिकाम्या राहिलेल्या ३ हजार ६९८ जागाही शिक्षण संस्थांना लगेच भरता येणार नाहीत. संपर्क साधल्यास अद्यापि शिक्षणाधिकारी या घटकांतील मुलांना प्रवेश मिळवुन देणार आहेत. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय संस्थांनाही या जागा भरता येणाऱ्या नाहीत.
या प्रवेशांची प्राथमिक शिक्षण विभागाकडुन मिळालेली तालुकानिहाय परिस्थिती पुढिलप्रमाणे (२५ टक्क्य़ांप्रमाणे एकुण जागा व कंसात दिलेले प्रवेश): नगर शहर व तालुका- १ हजार ६९२ (४०३), अकोले-११२ (४६), संगमनेर-५३० (३८), कोपरगाव-६७२ (३११), राहाता-४३४ (२५६), राहुरी-४९८ (१६९), शेवगाव-२१३ (११५), पाथर्डी-१५६ (६३), जामखेड-५८ (४), कर्जत-२१९ (५६), श्रीगोंदे-१३० (२६), पारनेर-१२५ (३३) व श्रीरामपुर-४१७ (११७). अल्पसंख्याकांच्या अनुदानित शाळा वगळता प्रवेशासाठी ३४९ शाळा पात्र होत्या. त्यातील ५ हजार ४४४ पेकी केवळ १ हजार ७४६ प्रवेश झाले.
या प्रवेशासाठी १ ते ३० जानेवारी दरम्यान अर्ज मागवले गेले होते. त्याची १५ फेब्रुवारीस छाननी झाली. २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रवेश दिले गेले. ज्या शाळांसाठी प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले तेथे सोडत पद्धतीने प्रवेश दिले गेले.