चितळी (ता. राहाता) येथील गोळीबारप्रकरणी आज पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक केली. मुख्य आरोपी शाहरूख रज्जाक शेख याच्यासह अन्य तिघे आरोपी अद्याप फरार आहेत.
चितळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांत झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विजय चौधरी याच्यावर शाहरूख शेख या पाप्या शेखच्या टोळीतील गुंडाने गावठी कट्टय़ातून गोळीबार केला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या विजयच्या प्रकृतीत सुधारणा होत असून अधिक औषधोपचारासाठी त्यास औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आज बबलू सुधाकर सूर्यवंशी व प्रशांत उद्धव साबळे या दोघांना अटक केली. त्यांना सोमवार दि.१०पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी तिघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी अभिरक्षण गृहात केली होती. गुंड शाहरूख शेख, स्वप्निल त्रिभुवन, गणेश पगारे हे तिघे आरोपी अद्याप फरार आहेत.
चार दिवसांपूर्वी चितळी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील गौरव चंद्रकात चौधरी व सचिन बाळासाहेब आरणे या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये चेष्टामस्करीवरून भांडण झाले होते. त्यावरून गौरव याच्यासह दत्तू मोहन चौधरी, कुलदीप रमेश चौधरी, राहुल बाजीराव चौधरी यांना काही मुले मारहाण करत होती. त्यात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विजय चौधरी याच्यावर शेख याने गोळीबार केला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर चितळी व जळगाव येथील नागरिक संतप्त झाले होते. पण पोलिसांनी गुन्हेगारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज पोलीस निरीक्षक कैलास फुंडकर यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम उघडली.