वारंवार विनंती करूनही शासकीय व निमशासकीय कर्मचारी ग्रामीण भागात नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या प्रश्नी आत्मदहनाचा इशारा दिलेल्या तीन तरुणांनी सोमवारी झाडावर चढून रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक प्रश्नांसाठी तरुणांनी केलेल्या ‘वीरूगिरी’ला गावकऱ्यांनीही पािठबा दिल्याने प्रशासनाने नमते घेतले. तहसीलदाराच्या आश्वासनानंतर तरुणांनी आंदोलन मागे घेतले.
जिल्हय़ात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची दांडी यात्रा नवीन नाही. शहराच्या व मुख्यालयाच्या ठिकाणीही अधिकारी कधीही वेळेवर भेटू शकत नाहीत. ग्रामीण भागात तर काही विचारायलाच नको, असे चित्र असते. नियुक्ती कोठेही असो, अधिकाऱ्यासह कर्मचारीही शहराच्या ठिकाणीच ठाण मांडून असतात. छोटय़ा-मोठय़ा गोष्टींसाठी नागरिकांना खेटे मारावे लागतात, हा सार्वत्रिक अनुभव नवीन नाही. शिरुर तालुक्यातील रायमोहा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. मात्र, या कार्यालयांत कोणीच वेळेवर उपलब्ध नसते. उपचारासाठी रुग्ण आल्यास डॉक्टर भेटतीलच याची शाश्वती नसते. शाळेत शिक्षक येत नाहीत. तलाठी, ग्रामसेवक यांचा तर पत्ताच नसतो. तक्रारी, विनंत्या करून वरिष्ठ अधिकारीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणांनी याच कर्मचाऱ्यांच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा दिला होता. सोमवारी गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मात्र, संग्राम जाधव, रोहिदास गायकवाड व गणेश जाधव या तरुणांनी गावातील एका िलबाच्या झाडावर चढून अंगावर रॉकेल ओतून वीरुगिरीचे आंदोलन सुरू केले. गावकऱ्यांनीही बाजारपेठ बंद ठेवून या आंदोलनाला पािठबा दिल्याने तालुक्याचे प्रशासन हतबल झाले. पाटोदा तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, लेखी आश्वासन व प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा हट्ट तरुणांनी धरला. चार तासांच्या प्रयत्नानंतर तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनाने अखेर तरुणांनी आंदोलन मागे घेतले.