पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमातील ५४६ कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार रखडला होता. ‘ठाणे वृत्तान्त’ने हे वृत्त प्रकाशित करताच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, महापालिका प्रशासनाने तातडीने ३५ लाख रुपयांचे अनुदान परिवहन उपक्रमाला उपलब्ध करून दिले. या रकमेतून कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात आला.
कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाची अवस्था सध्या बिकट बनली असून आर्थिक तोटा दिवसेंदिवस वाढू लागल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. मध्यंतरी स्थायी समितीने परिवहन उपक्रमाला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमासाठी प्रशासनाकडून सुमारे तीन कोटी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद दहा कोटी करण्याच्या हालचाली परिवहन उपक्रम आणि प्रशासनाच्या चर्चेतून सुरू असल्याचे समजते.
आर्थिक अडचणींच्या फे ऱ्यात सापडलेल्या केडीएमटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांचा पगार देणेही कठीण जात असल्याचे चित्र आहे.
यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. अखेर तातडीने ३५ लाख रुपयांचा निधी पुढे करीत या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात आल्याचे वृत्त आहे.