वाहनचालकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दत्तात्रय सर्जेराव गणगे (वय ३५, रा. सुरेगाव गळनिंब, ता. नेवासे) यास येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी पाच वर्षे सक्तमजुरी व ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
शाहूराव भाऊराव हिवाळे असे मृत तरुणाचे नाव आहे. हिवाळे हा गणगे याच्या गाडीवर चालक होता. गणगे याने पगार न दिल्यामुळे तो हा कामावर गेला नाही. दि. २६ जून २००७ रोजी गणगे याने पैसे देण्याच्या बहाण्याने त्यास घरून नेवासा फाटा येथे नेले. तेथे त्यास शिवीगाळ केली. त्यानंतर दुस-या दिवशी हिवाळेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला झाडाखाली आढळून आला.
मृत शाहूरावची पत्नी प्रेरणा हिने दिलेल्या फिर्यादीवरून गणगे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सहायक जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. वकील भानुदास तांबे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. भाऊराव हिवाळे, पांडुरंग कांबळे, प्रेरणा हिवाळे, बाळासाहेब केदार, डॉ. रमेश घुमरे, सुरेश राऊत यांच्या साक्षी महत्वपर्ण ठरल्या. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने गणगे यास पाच वर्षे सक्तमजुरी व ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ३५ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून प्रेरणा हिला देण्याचे आदेश देण्यात आले.