नांदुरी गडावरील सप्तशृंगी देवीची सकाळी सात वाजता महापूजा करण्यात आली. या वेळी सप्तशृंगी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते. देवीच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गड चढण्यास सुरुवात केली होती. गडाच्या पायथ्यापासून पहाटे बससेवेला सुरुवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता. ‘सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
उत्सवकाळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाविकांना उत्सव काळात २४ तास दर्शन घेता येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदुरी येथून प्रवाशांनी कमीतकमी सामान गडावर घेऊन जावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच उत्सवकाळात हातगाडीवाले, फेरीवाले, दुकानदार जे कोणी अतिक्रमण करेल, त्यांच्याविरुद्ध वन, पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाने नाशिक-वणी मार्गावर जवळपास ३०० जादा बसेस सोडल्या आहेत.
याशिवाय जादा गर्दीच्या ठिकाणी ८९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. ‘शिवालय’ या तलावाच्या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता मंदिरात महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते कालिकामाता, महालक्ष्मी व सरस्वती मातेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘श्री कालिका देवी मंदिर नाशिक’ या संकेतस्थळाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मंदिराचे विश्वस्त अण्णा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. दर्शनासाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळनंतर दर्शनासाठी भाविकांची अधिक गर्दी झाली. भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून २०० ते २५० स्वयंसेवक व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भाविकांना मंदिर परिसरात काही दुखापत झाली किंवा दुर्घटना घडली तर त्याकरिता तीन कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे.
देवीच्या दागिन्यांचा एक कोटीचा विमा उतरविण्यात आला आहे. वाहतूकनियोजनासाठी पोलीस यंत्रणेने दुपारी चारपासून त्र्यंबक नाका सिग्नल ते मुंबई नाका परिसर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. या मार्गावरील वाहतूक खडकाळी, द्वारकामार्गे वळविण्यात आली. दरम्यान, शहर परिसरातील अनेक देवी मंदिरांना नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई व रंगरंगोटी करण्यात आली. यानिमित्ताने अनेक सार्वजनिक मंडळांनी गरबा व दांडिया रासचे आयोजन केले आहे. गांधीनगर येथे बंगाली बांधवांतर्फे अर्धशतकाहूनही अधिक काळापासून सार्वजनिक दूर्गापूजा उत्सवाची परंपरा कायम आहे.

‘दुर्गे दुर्घट भारी.’, ‘उदो बोला उदो बोला महालक्ष्मी मातेचा.’च्या जयघोषात व ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ दुर्गा मातेची विधिवत स्थापना करीत असताना नांदुरी येथील गडावरील सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी पहिल्याच माळेला सुमारे ५० ते ६० हजार भाविकांनी हजेरी लावली. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकामातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्याचे पाहावयास मिळाले. ‘श्री नाशिक कालिका मंदिर नाशिक’ या संकेतस्थळाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.