वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात नवी मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. या कारवाईअंतर्गत ६३ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
पाम बीच मार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन २७ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान वाशी, सीवूड्स व सीबीडी या वाहतूक शाखांच्या हद्दीमध्ये मोटर वाहन कायद्यांतर्गत विशेष कारवाई मोहीम घेण्यात आली. नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत वाशी वाहतूक शाखेतर्फे एकूण ६३ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखांतील अतिरिक्त पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. अपघात टाळण्याच्या दृष्टीने चालकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.