पूर्ण जून महिन्यात पावसाने मारलेल्या दडीने आणि वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना आज बरसणाऱ्या जलधारांनी दिलासा दिला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाने नोंदविलेल्या नोंदीनुसार आज दुपारी शहरात सरासरी ७१ मिमी पाऊस पडला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहरात सर्वाधिक ऐरोली विभागात पाऊस नोंदविण्यात आला आहे. मोरबे धरणातील पुरेशा जलसाठय़ामुळे पाणीकपातीला सामना करण्याची वेळ नवी मुंबईकरांवर आलेली नसली तरी गेल्या काही दिवसात वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. शाळेचा पहिला दिवस आणि पाऊस असे काहीसे असलेले समीकरण. पहिल्या दिवशी शाळेत जाताना नवीन छत्री किंवा रेनकोटची मज्जा यावेळी विद्यार्थ्यांना लुटता आली नव्हती. मात्र आज ही संधी पावसाने दिल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे छत्री आणि रेनकोट दिसत होते. सकाळपासून असलेल्या पावसामुळे चाकरम्यांन्याची काहीशी धांदल उडाली होती. यातच रिक्षावाल्यांकडून जवळचे भाडे नाकारण्यात येत असल्याने प्रवासी संतापले होते. शहरात ऐरोली विभागात ९८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून त्या पाठोपाठ वाशी विभागात ६६.४० मिमी आणि नेरूळमध्ये ५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.