विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात शुक्रवारी एकाच दिवशी ७५ हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आधी पितृपक्ष आणि नंतर जागा वाटपाचा घोळ यामुळे अर्ज भरण्याचे घोडे रखडले होते. युती व आघाडीने स्वतंत्र लढण्याचा मार्ग स्वीकारल्यानंतर अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड उडाली. अनेक दिग्गज नेत्यांसह अपक्ष उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले. सर्वाधिक अर्ज बागलाणमध्ये तर सर्वात कमी अर्ज कळवण मतदारसंघात दाखल झाले. बहुतांश मतदारसंघात एकाच दिवशी ही गर्दी झाल्यामुळे निवडणूक यंत्रणेची दमछाक झाली.
मागील शनिवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण, तेव्हा पितृपक्ष असल्याने इच्छुकांनी अर्ज दाखल केले नाहीत. दरम्यानच्या काळात काँग्रेस आघाडी तसेच सेना-भाजप युतीमध्ये जागा वाटपावरून वाद झाले. आघाडी वा युती होईल की नाही याची साशंकता असल्याने पुढील दोन दिवसही फारसे अर्ज दाखल झाले नाहीत. अखेरच्या क्षणी युती व आघाडीतील पक्षांमध्ये ताटातुट झाल्यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी ठिकठिकाणी पहावयास मिळाले. एकाच दिवशी ७५ हून अधिक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. मालगाव मध्यसाठी १, मालेगाव बाह्य सहा, बागलाण ११, कळवण १, चांदवड ३, येवला ४, सिन्नर ७, निफाड ४, दिंडोरी ८, नाशिक पूर्व ६, देवळाली ५, इगतपुरी मतदारसंघासाठी ४ अशा एकूण ६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नाशिक मध्य व नाशिक पश्चिमची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही. कोणी दोन तर कोणी तीन अर्ज दाखल केले असल्याने दाखल झालेल्या एकूण अर्जाची संख्या जवळपास दोनशेच्या घरात असल्याचा निवडणूक यंत्रणेचा अंदाज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज दाखल करणे पसंत केले असले तरी भाजपने शहरातील मतदारसंघात अर्ज भरणे टाळले. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर आमचे उमेदवार अर्ज भरणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. अर्जाची प्राथमिक छाननी, अनामत रक्कम स्वीकारणे आणि नंतर हा अर्ज दाखल करणे या प्रक्रियेस प्रत्येक उमेदवाराला किमान अर्धा तासाचा अवधी लागतो. काही मतदारसंघात एकाच दिवशी पाच ते दहा उमेदवार समोरासमोर येऊन उभे ठाकल्याने विहित प्रक्रिया पूर्ण करताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.