‘आरे’कॉलनी दृष्टीक्षेपात
*‘आरे कॉलनी’ची मूळ जागा १६१९ हेक्टर
* एकूण जागेपैंकी सुमारे ३७८ हेक्टर जागा केंद्र सरकारी-राज्य  सरकारी संस्था, आदिवासी पाडे, तबेले आदींसाठी
* गेल्या काही वर्षांत झोपडपट्टीही प्रचंड वाढ
* आता आरे कॉलनीच्या १००९ हेक्टर जागेचा समावेश विकास आराखडय़ात करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस

आतापर्यंत ‘ना विकास क्षेत्र’ असलेल्या आरे कॉलनीचा समावेश मुंबईच्या विकास आराखडय़ात करण्याचा प्रस्ताव आणि कुलाबा ते सीप्झ या तिसऱ्या मेट्रो रेल्वेच्या कारडेपोसाठी आरे कॉलनीतील जागेचा वापर करण्याच्या मुद्दय़ावरून मुंबईची राजकीय-सामाजिक हवा चांगलीच तापली आहे. शिवसेना-मनसेसारख्या राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी आरेची हिरवळ-निसर्ग वाचवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र सरकारी आस्थापने असोत की खासगी बिल्डरांचे प्रकल्प, आरेची जमीन वेळोवेळी वापरली गेली. शिवाय झोपडपट्टीही पसरत चालली आहे..‘लोकसत्ता’ने केलेल्या पाहणीतील निवडक छायाचित्रांमधून ‘आरे’मधील वाढत्या काँक्रीटच्या जंगलाचे-बांधकामांचे हे भीषण रूप समोर आले. त्यामुळे आरेच्या निसर्गाचे अधिकृत-अवैध लचके तोडले जात असताना हे सारे ‘आरे’प्रेमी कुठे गेले होते? असा सवाल उपस्थित झाला आहे.
गेल्या काही दिवसांत आरे कॉलनी व तेथील निसर्ग हा अचानक मोठा विषय झाला. आतापर्यंत कधी त्याकडे-तेथील समस्यांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या मंडळींना ‘आरे’प्रेमाचे भरते आले. एकानंतर एक राजकीय पक्षांचे नेते-त्यांचे निकटवर्तीय आरे कॉलनीत जाऊन थडकू लागले. राजकीय पक्ष-नेतेमंडळी निसर्गाविषयी, शहरातील हरित पट्टय़ांविषयी इतकी जागरूक आहेत हे पाहून ‘ऐकावे ते नवलच’ अशी अवस्था सामान्य मुंबईकरांची झाली. कारण आरेमध्ये बांधकामे हातपाय पसरत आहेत याची सर्वाना कल्पना आहे.
वर्षांनुवर्षे आरेच्या निसर्गाच्या कुशीत राहणारे व हा निसर्ग-वन्यजीवन यांना जपणारे आदिवासी व त्यांचे पाडे हे आरेतील मूळ निवासी. पण काळाच्या ओघात नानाविध सरकारी संस्था, न्यूझीलंड हॉस्टेल, ‘फोर्स वन’सारखी संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आस्थापनेसाठीची जागा या विविध कामांसाठी आरेमध्ये अधिकृत बांधकाम झाले.
आरेच्याच कुशीत रॉयल पाल्मसारखा खासगी निवासी प्रकल्प उभा राहिला. रॉयल पाल्मच्या अवतीभवतीही आरेच्या जमिनीवर दुकाने, छोटी छोटी घरे वाढत चालली आहेत हे चित्र यावेळी दिसून आले. त्याचबरोबर पाडय़ांच्या आजूबाजूला ठिकठिकाणी अनधिकृत झोपडपट्टीही पसरत चालली आहे. झोपडय़ांचे व त्यावरील डिश अँटेनांचे पुंजकेच आरेच्या हिरव्या पट्टय़ात ठिकठिकाणी उगवले आहेत. शिवाय तबेले आहेतच. युनिट क्रमांक ७, १९, २१, २२ अशा विविध ठिकाणी वस्ती वाढत असल्याचे चित्र आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोजगार-व्यवसायासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक स्थायिक होत असल्याने गेल्या ५५ वर्षांत हळूहळू काँक्रीटचे जंगल उभे राहिले. मात्र त्याचवेळी सुदैवाने पवई आयआयटीचा परिसर, आरे मिल्क कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदींच्या रूपाने मोठे वनक्षेत्र-हरितपट्टे असल्याने मुंबईची फुफ्फुसे कार्यरत आहेत. ही सारी हिरवळ वाचवण्याची गरज असून निव्वळ बाता मारून आणि प्रसिद्धीभिमुख आंदोलने करण्याऐवजी खरोखर आरेची हिरवळ वाचवण्यासाठी आता नियोजनबद्धपणे काम होण्याची गरज आरेतील सध्याचे चित्र अधोरेखित करत आहे.