गणेशोत्सवासाठी खास सवलतीच्या दरात तात्पुरती वीजजोडणी देण्याच्या ‘बेस्ट’च्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र तरीही अनेक मंडळांनी वीजचोरीचा पारंपरिक मार्गच अवलंबल्याचे उघडकीस आले आहे. दक्षिण मुंबईपासून माहीम आणि शीवपर्यंतच्या ‘बेस्ट’च्या हद्दीतील ३३ मंडळांवर ‘बेस्ट’च्या भरारी पथकाने वीजचोरीबद्दल कारवाई केली. या कारवाईमध्ये गणेशोत्सव मंडळांकडून एकूण ९९,५२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या आधीपासून बेस्टने विविध जाहिरातींच्या माध्यमातून तात्पुरती वीज जोडणी घेण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले होते. त्यानुसार तब्बल एक हजार मंडळांना ‘बेस्ट’ने गणेशोत्सवाच्या कालावधीपुरती तात्पुरती वीज जोडणी करून दिली. यंदा बेस्टतर्फे १२४८ तात्पुरती वीजमीटर बसवण्यात आली. यापैकी २६० वीजमीटर एकटय़ा ‘लालबागच्या राजा’ला देण्यात आली आहेत. ही वीज व्यावसायिक दरापेक्षा कमी दराने देण्यात येते.
गणेशोत्सवाच्या काळात ‘बेस्ट’ची भरारी पथके विविध मंडळांवर छापे मारत असतात. या छाप्यांमध्ये सोमवापर्यंत ३३ मंडळांना वीजचोरी करताना पकडण्यात आले होते. या मंडळांनी किती युनिट वीज वापरली, हे पाहून त्यांना दंड आकारण्यात आला असून या दंडापोटी आतापर्यंत ९९ हजार ५२० रुपये बेस्टच्या तिजोरीत जमा झाले आहेत. बेस्टच्या भरारी पथकांनी मारलेल्या छाप्यात दर दिवशी वीजचोरी करणारी चार ते पाच मंडळे सापडल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. गेल्या वर्षी बेस्टने केलेल्या धडक कारवाईत २० मंडळे वीजचोरी करताना आढळली होती. त्यांच्याकडून ७९,१९७ रुपये दंड वसूल करण्यात आला होता.