कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे टाके काढण्यासाठी आलेल्या महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या तालुक्यातील पिंपरखेडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी शैलेश वाघ यास नागरिकांनी चांगलाच चोप दिला. सदर महिलेच्या लेखी तक्रारीनंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संबंधित अधिकाऱ्यास कार्यमुक्त करण्यात आले.
शस्त्रक्रिया करण्यासाठी माहेरी आलेली गरीब कुटुंबातील महिला सकाळी १०.३० वाजता शस्त्रक्रियेचे टाके काढण्यासाठी पिंपरखेडे आरोग्य केंद्रात आली होती. टाके काढल्यानंतर वैद्यकीय अधिकारी वाघ याने महिलेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भेदरलेल्या महिलेने ही माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. यापूर्वी याच अधिकाऱ्याने असे प्रकार केले असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रावर धाव घेत अधिकाऱ्याला चांगला चोप दिला. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या गटविकास अधिकारी चित्रकला कोठावळे, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ससाणे यांनी ग्रामस्थांच्या तीव्र भावना समजावून घेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. चौकशी करून तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश केले. या वेळी अल्पशिक्षित महिलेचा तक्रार अर्ज अधिकाऱ्यासमक्ष लिहून घेण्यात आला.
लेखी तक्रार वरिष्ठांना पाठविल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तत्काळ वाघ यास कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. उपस्थित ग्रामस्थांनी याच अधिकाऱ्याने यापूर्वी केलेल्या अशाच घटनांना उजळणी दिल्यावर अधिकारीही अवाक झाले. गावातील काही जणांनी संबंधित अधिकाऱ्यास संतप्त ग्रामस्थांपासून सुरक्षित ठेवले. महिलेने तक्रार दिल्यानंतर हा अधिकारी गटविकास अधिकाऱ्याच्या वाहनातून जाण्यासाठी बाहेर निघाला असता संतप्त नागरिकांनी त्यास पुन्हा चोप दिला. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याची सोडवणूक केली.