शासनाचे नियम तोडणाऱ्या स्कूल बस व ऑटोरिक्षा विरोधात प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर पोलीस विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. आरटीओ ने पहिल्याच दिवशी शालेय बसेस आणि अनेक ऑटोरिक्षांची तपासणी करून नियम न पाळणाऱ्या २७ शालेय बसेस आणि ३० ऑटोरिक्षा जप्त केले. तसेच स्कूल बस असलेल्या शाळांच्या प्रशासनांना नोटीस बजावण्यात आली आहे.
शालेय बस वाहतुकीच्या माध्यमातून शहरातील हजारो विद्यार्थी शाळेत जाणे-येणे करतात. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय बसमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना वाहनचालकांना केल्या होत्या. परंतु जवळपास ४०० शालेय बस चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. शालेय बसेस आणि ऑटोरिक्षांना नियम पाळण्याच्या सूचना वारंवार देण्यात आल्या होत्या. नुकत्याच शाळा सुरू झाल्याने प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने ऑटोरिक्षा विरोधात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली.
शहराच्या विविध भागात पूर्व, पश्चिम तसेच ग्रामीण आणि इतर अशा पाच पथकांनी ६७ शालेय बसेसची तपासणी केल्यावर २७ स्कूल बसेस नियम पाळत नसल्याने त्या जप्त करण्यात आल्या. एकूण १२ स्कूल बस मालकांकडून ६४ हजार ९०० रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. बाकी सर्व बसेस अडकवून ठेवण्यात आल्या होत्या. यादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या ऑटोरिक्षांची देखील तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३० ऑटोचालकांवरही कारवाई करून त्यांचे ऑटो जप्त करण्यात आले आहे. या सर्वामुळे स्कूल बसचालक आणि ऑटोरिक्षा चालक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्कूल बस प्रशासनाला नोटीस बजावल्याची माहिती असून नियमानुसार दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. बसला पिवळा रंग, बसच्या खिडक्यांना दांडे बसविणे, तसेच आपतकालीन खिडकी बसविणे, अग्निशमन यंत्राची सोय असणे आदी सूचना स्कूल बस चालक प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.