इलेक्ट्रॉनिक मीटर तसेच परवाना नसलेल्या रिक्षा चालकांविरोधात प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलीस यांनी कारवाई सुरू केली असून बुधवारी शहरात ३१ रिक्षा जप्त करण्यात आल्या. पोलिसांच्या कारवाईमुळे संतप्त रिक्षा चालकांनी संघटनेच्या अध्यक्षांनाच घेराव घालत याप्रकरणी आवाज उठविण्याची मागणी केली.
रिक्षांसाठी इलेक्ट्रॉनिक मीटर अनिवार्य करण्यात आले आहे. अजूनही बहुतेक रिक्षा चालकांनी हे मीटर बसविलेले नाही. या मीटरची किंमत २६०० रूपयांपेक्षा अधिक असल्याने खर्चिक मीटर घेणे आपणांस परवडणारे नसल्याचे काही रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.
याशिवाय धुळ्यातील प्रवासी मीटरप्रमाणे पैसे देण्यास तयार होत नाहीत, असेही कारण रिक्षा चालकांकडून पुढे करण्यात येत आहे. १९९७ पासून रिक्षा चालकांना परवानाच देण्यात आलेला नाही. त्यामुळे विना परवाना रिक्षा वाहतूक करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचेही त्यांच्या वतीने सांगण्यात येते.
इलेक्ट्रॉनिक मीटर, परवाना तसेच रिक्षा वाहतुकीसी संबंधित कागदपत्रे तपासणी मोहीम प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलिसांनी सुरू केली असून ३१ रिक्षांवर याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस कारवाई करत असतानाही संघटनेचे पदाधिकारी शांत असल्याने संतप्त रिक्षा चालकांनी बुधवारी वंदे मातरम् रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र ठोंबरे यांना घेराव घातला. त्यांच्याकडे काही मागण्याही मांडण्यात आल्या.