घराघरात स्मार्टफोन ही नवी संस्कृती तयार होत असताना मुलांना त्यापासून दूर कसे ठेवावे, हाही पालकांसाठी काळजीचा विषय झाला आहे. स्मार्टफोन व त्यातून सहज उपलब्ध होऊ लागलेल्या लैंगिक माहितीमुळे मुलांच्या मानसिक व शारीरिक वर्तनात बदल होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. मुलांच्या विक्षिप्त वागण्यापासून ते मुलींच्या लवकर वयात येण्यापर्यंत सगळेच बदल इंटरनेटच्या अतिवापराने होत असल्याचे दिसू लागले आहे.  
स्मार्टफोन व इंटरनेट या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत व तंत्रज्ञान उशाशी घेऊन जन्मलेल्या मुलांसाठी ते हाताळणे सहज बाब ठरत आहे. स्मार्टफोनचा स्मार्ट वापर करणारी पाच व सहा वर्षांची बालके, हे चित्र घराघरात सामान्य झाले आहे. या अतिवापरातून मुलांच्या मानसिक व शारीरिक विश्वात लैंगिक बदल घडत आहेत. दहा-अकरा वर्षांच्या मुलांची शारीरिक वाढ झालेली नसतानाही लैंगिक भावनांच्या बाबतीत मात्र ते पुढारलेले आहेत. या वयातील मुलांना लैंगिक बाबींचे ज्ञान नसेल, हा समज पूर्णत: खोटा ठरत आहे. मुलांच्या आपापसातील गप्पा, त्यांचे व्हॉटस् अ‍ॅपसारख्या माध्यमातून होणारे संवाद तपासले तर मुले कुठवर पोहोचली आहेत, हे लक्षात येते. त्यांना लैंगिक संबंधांची जाणीव नाही. मात्र, आपण मोठे होत आहोत, याचे भान आहे व त्यातून समाजात गुपीत समजल्या जाणाऱ्या गोष्टी करून बघण्याची इच्छा मुलांमध्ये तयार होते.
स्मार्टफोन आणि त्याद्वारे इंटरनेट सहज हाताळता येत असल्याने मुलांना सहजच सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत व त्याचे मुलांवरील दुष्परिणामही दिसू लागले आहेत. लैंगिकताविषयक गोष्टी अतिप्रमाणात मुलांना उपलब्ध होत असल्याने त्यांची वागण्याची पध्दतही बदलली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात दडपणाखाली ही मुले वावरत आहेत. पालकांच्या नकळत सोशल मीडिया व इंटरनेट यांच्याद्वारे मुलांपर्यंत लैंगिक विषयांचा ‘ओव्हरडोज’ पोहोचत आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मित्रांमध्ये या गोष्टींची चर्चा करून आपणही ‘मोठे’ झालो असल्याचा प्रयत्न मुलांकडून होत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. विक्षिप्त वागणूक, अभ्यासात लक्ष न लागणे, त्यातून होणारा वेगळा मनस्ताप, अशा सगळ्या गोष्टींना ९ ते १८ या वयोगटातील मुले सामोरी जात आहेत. मुलींमध्ये मासिक पाळी लवकर येण्याचे प्रकारही लक्षात आले असून नकळत्या वयात इंटरनेट व स्मार्टफोनद्वारे कोसळणारा लैंगिक माहितीचा पूरही याला कारणीभूत ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

त्यातून वेगळे विश्व
सुरुवातीला मुले चिडचीड करतात म्हणून पालक त्यांना आमच्याकडे घेऊन येतात. मुलांशी बोलल्यानंतर स्मार्टफोन व इंटरनेटच्या वापरातून मिळणाऱ्या लैंगिक गोष्टींशी त्यांच्या वर्तनाचा संबंध असल्याचे अनेकदा लक्षात आले आहे. मुले स्वत:चे एक वेगळे विश्व तयार करू लागली आहेत व यात लैंगिक गोष्टींचाही समावेश आहे. यातून एक नकारात्मकता त्यांच्यात निर्माण होत आहे. पालक झोपल्यावर मुले रात्री इंटरनेटचा वापर करून या सगळ्या गोष्टी बघतात. मोबाईल्सवर रात्री पोर्नग्राफी बघितल्याचे मुले अनेकदा आमच्याकडे मान्य करतात.
डॉ. शैलेश पानगावकर, मानसोपचार तज्ज्ञ

वापर शिकवण्याची गरज
मोबाईल्स मुलांना चमत्कृती देत आहेत. स्मार्टफोन्स अन् इंटरनेट हेच पालक बनले आहेत. शरीराची जैविक गती व मानसिक गती यात प्रचंड फरक पडत आहे. ३० व ३५ वर्षांच्या लोकांमध्ये लैंगिक उदासीनता निर्माण झाल्याची उदाहरणे  परदेशात दिसतात. लहानपणी लैंगिक विषयांची नको त्या स्वरूपात माहिती मिळाल्याने असे प्रकार घडतात. आमच्या समाजाची वाटचाल त्या दिशेने होत आहे. जे बघून मोठय़ांना ओशाळल्यासारखे वाटावे, त्या गोष्टी कोवळ्या वयातील मुलांसाठी सहज ठरत आहेत. उपकरणे वापरण्याचा विवेक शिकवण्याची गरज असून याबाबत पालकांनी विचार करावा.
रवी महाजन, सेतू संस्था