राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन व्यवस्थेच्या तज्ज्ञ चमूने जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे पाठ दिले. मात्र, अलीकडेच झालेल्या पावसाने रस्त्यांची वाहतूक सुरू करण्यात हे कौशल्य अपुरे ठरल्याचे चित्र पुढे आले आहे.
जिल्हा व ग्रामपातळीवरील महत्वाच्या कर्मचाऱ्यांचे जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्रशिक्षण झाले. आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञांनी त्यांना बारकावे समजावून सांगितले. केवळ फाईलींपुरताच कामकामाचा अनुभव असलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांची आता रस्त्यावर उतरून काम करण्यात कसोटी लागत आहे. डोंगरगाव व आसोला मार्ग संततधार वृष्टीने बंद पडला. त्यासाठी विशेष चमू पाठविण्यात आला. दुरुस्ती व मार्ग पूर्ववत होण्यास विलंब लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरा-गिरड, गिरड-उमरेड, आष्टी-तळेगाव हे मार्ग पावसाने ठप्प पडले. सिरसी येथे पुलावरून पाणी वाहू लागले. आष्टी-तळेगाव मार्गावर कच्चा रस्त्यामुळे वाहतूक अडचणीची ठरली आहे. लालनाला प्रकल्प व नांद जलाशयाचे चार दरवाजे उघडण्यात आल्याने परिसरातील गावात पूर उद्भवू शकतो. या अशा संकटांना तोंड देण्यासाठी प्रशासनाची लगबग उडाली आहे. अतिवृष्टी झाली असली तरी पुरामुळे गाव किंवा अन्य मालमत्ता वाहून जाण्याची स्थिती सध्याच उद्भवली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाठे यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले की, जिल्ह्य़ात अद्याप कु ठेही धोकादायक स्थिती नाही. निर्माण झाली तरीही प्रशासन सज्ज आहे. २४ तास चालणारे जिल्हा व तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष कार्यरत झाले असून गावपातळीवर प्रमुख कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क सुरू आहे. आकस्मिक प्रसंगासाठी पट्टीच्या पोहणाऱ्यांचा चमू, तसेच बोटीही तयार ठेवण्यात आल्या आहे. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य यंत्रणेस सतर्क करण्यात आले असून पाणी शुध्दीकरणाची खबरदारी घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.     प्रशासनाची कसोटी लागणारी स्थिती अद्याप जिल्ह्य़ात निर्माण झालेली नाही. खरी कसोटी आरोग्य यंत्रणेचीच आहे. काही भागात डायरियाचे रुग्ण आढळून आले. पण, अशा रुग्णांना जागेवरच उपचार मिळू न शकल्याने त्यांना लगतच्या मोठय़ा रुग्णालयात हलविण्याची वेळ आली. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची निम्मी पदे रिक्त आहेत. तीनशेवर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असतांना गावपातळीवरील आरोग्य व्यवस्थेला सामोरे जाणार कसे, हा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र, ही पदे लवकरच भरली जाणार असल्याचे उत्तर प्रशासनाकडून ऐकायला मिळाले.
आरोग्य यंत्रणा डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी सक्षम राहणे शक्य नाही. पण, आपातकालीन प्रसंगी विशेष चमू तयार ठेवण्यात आल्याची मखलाशी आरोग्य प्रशासनाकडून केली जाते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने म्हणाले की, जोखमीची अशी २१ गावे आहेत. याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे नाहीत. मात्र, लगतच्या उपकेंद्रात पुरेसा औषध साठा ठेवण्यात आला. पाणी शुध्द करून पिण्यायोग्य करता येईल, असेही साहित्य दिले आहे. कठीण प्रसंगी लागणारे आवश्यक ते मनुष्यबळ असल्याचा दावाही डॉ. माने यांनी केला.