डोंबिवलीत गेल्या दोन आठवडय़ात विनयभंग, बलात्काराच्या जेवढय़ा घटना घडल्या आहेत. त्यामधील आरोपींचे पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे चोचले पुरवू नयते, या आरोपींना जन्माची अद्दल घडल्याच्या शिक्षा झाल्या पाहिजेत, अशा पध्दतीने या आरोपींचे कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी दस्तावेज तयार करावेत. कोणत्याही आरोपीबाबत पोलिसांकडून मोकळीक मिळत असेल किंवा खोणी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी शाही थाटात ठेवण्याचा प्रयत्न केला, तर डोंबिवलीत उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सोमवारी मानपाडा येथे दिला.
डोंबिवलीत दररोज विनयभंग, बलात्काराच्या घटना घडत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याने गुन्हेगार अशाप्रकारची कृत्य करण्यास धजावत आहेत अशी टीका लांडगे यांनी केली. सोमवारी दुपारी सुमारे दीडशे शिवसैनिक मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगांच्या आरोपींना पोलीस कोणत्या थाटात ठेवतात याची पाहणी करण्यासाठी गेले होते. खोणी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलीस शाही थाटात ठेवत असल्याचे तक्रारदार मुलीच्या वडिलांचे म्हणणे होते. त्याचा जाब विचारण्यासाठी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक, महिला मानपाडा पोलीस ठाण्यात जमले होते.  यावेळी आरोपी अजय कोळोखे याला महिला शिवसैनिकांनी प्रसाद देण्याची तयारी केली होती. पण पोलिसांनी त्याला शिताफीने लॉकरमध्ये नेले. या आरोपीने पुन्हा कधी गुन्हा करू नये म्हणून त्याचे तोंड दाखविण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. त्यावेळी फक्त एक मिनीट त्याचे तोंड दाखविण्यात आले. विनयभंगातील आरोपीच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. आरोपीला आरोपीप्रमाणेच वागविण्यात येईल. त्याला कोणतीही सूट देण्यात येणार नाही, असे मानपाडय़ाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत महिरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.