नव्या हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर आता या केंद्रातून वाहतूक नियंत्रण सुरू झाले आहे. आता येणाऱ्या काळात ही वाहतूक अधिक सक्षम आणि सुरळीतपणे होण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण प्राधिकरणाने ‘सिमलेस एअर ट्राफिक मॉनिटिरग’ आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ातील पंचसूत्रीच्या आधारे येत्या ३-४ वर्षांत संपूर्ण देशभरातील हवाई वाहतूक मुंबईतूनच नियंत्रित करणे शक्य होणार आहे.
नव्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अद्यावत तंत्रज्ञानामुळे सध्या मुंबई विमानतळावरून दर तासाला ४८ विमानांची ये-जा होते. ही क्षमता ५० ते ५४ पर्यंत वाढवण्यासाठी अधिक सक्षम तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने एक पंचसूत्री तयार केली आहे.
या पंचसूत्रीत हवाई नियंत्रकांचे प्रशिक्षण, हवाई वाहतुकीसाठी लागणाऱ्या जागेचे सुसूत्रीकरण, विमान वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या एकूण तपशिलाचे सूत्रीकरण आदींचा समावेश असणार आहे. ‘भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे’ दासगुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी दोन विमानांमधील अंतर सारखे असावे लागते. त्याचप्रमाणे संपर्काची भाषा एकच असावी लागते.
सध्या भारतीय रडार यंत्रणा आणि हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा अन्य देशांच्या तुलनेत अद्ययावत नाहीत. त्यामुळे या पंचसूत्रीच्या आधारे त्यातील त्रुटी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे दासगुप्ता यांनी स्पष्ट केले.

पंचसूत्री :
१) मनुष्यबळ विकास – वाहतूक नियंत्रकांना काही ठरावीक काळानंतर अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी इंटिग्रेटेड एअर ट्राफिक सिम्युलेटरची मदत घेतली जाईल.
 २) माहितीची सुसूत्रता – विमान वाहतुकीसंबंधी आवश्यक असलेली सर्व माहिती देशातील कोणत्याही हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राला मिळेल, अशी यंत्रणा उभारण्यात येईल.
 ३) टोटल सर्वेलन्स कव्हरेज – देशातील कोणत्याही हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रातून देशभरातील कोणत्याही विमानावर लक्ष ठेवता येऊ शकेल.
 ४) एअरस्पेसच्या वापरातील लवचीकता – दोन भिन्न एअरस्पेसमध्ये हवाई वाहतूक करण्याबाबत लवचीकता आणणे. सध्या ४,००० ते २७,००० आणि २७,००० ते ४६,००० फूट अशा दोन वेगवेगळ्या स्तरांवरून हवाई वाहतूक चालते. दीर्घ पल्ल्याची विमाने दुसऱ्या स्तरावरून वाहतूक करतात, तर कमी अंतराची विमाने खालून वाहतूक करतात.
 ५) ‘नॅव्हिगेशन’ – विमानाची वाहतूक लक्षात घेऊन त्या आधारे विमानाला योग्य दिशा दाखवण्याचे काम रडार यंत्रणेद्वारे करण्यात येते. यापुढे वैमानिकाला नियंत्रण केंद्राद्वारे मागणी न करताही योग्य दिशा दाखवण्यात येईल.