18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

अक्षयला वेध ‘मराठी’चे

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकाराने एखाद्या हिंदी चित्रपटात मराठी माणसाची व्यक्तिरेखा साकारणे वेगळे, एखाद्या मराठी

प्रतिनिधी | Updated: November 22, 2012 9:29 AM

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकाराने एखाद्या हिंदी चित्रपटात मराठी माणसाची व्यक्तिरेखा साकारणे वेगळे, एखाद्या मराठी चित्रपटात लहानशी एखादी भूमिका करणेही वेगळे पण, संपूर्ण मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचे आव्हान जर अशा कलाकारांनी घेतले तर नक्कीच लोकांच्या मनात कुतूहल जागे होते. अभिनेता अक्षय कुमारने आत्तापर्यंत अगदी एखाद-दुसऱ्या चित्रपटात मराठी माणूस साकारला आहे. तरीही प्रादेशिक चित्रपटनिर्मितीत उतरण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या अक्षयने मराठी चित्रपटाची निर्मिती करायचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांच्या ‘ग्रेझिंग गोट’ या निर्मिती संस्थेच्या बॅनरखाली ‘७२ मैल – एक प्रवास’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. अशोक व्हटकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित असा हा चित्रपट असेल. या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील, दिग्दर्शक कोण असेल, याबद्दलचे तपशील अजून निश्चित व्हायचे आहेत. अभिनेता रितेश देशमुखने ‘बालक-पालक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. रितेश स्वत मराठी असल्याने त्याचे मराठी चित्रपटाशी असलेला संबंध सहज जुळवता येऊ शकतो. अक्षय कुमारच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे त्याची नाळ मराठीशी जुळली गेली, असे तो नेहमी सांगतो.
सुरूवातीच्या काळात मुंबईत येऊन हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी धडपडणारा अक्षय कुमार बेस्टच्या बसेसमधून जीवाची मुंबई करत होता. त्याच दरम्यान एकदा बसमध्ये चढलेल्या अक्षयला कंडक्टरने मराठीत एका बाजूला उभा रहा, असे सांगितले. परंतु, मराठी येत नसल्याने अक्षयला काहीच कळले नाही आणि तो तिथेच उभा राहिला. त्याच्या या वागण्याने कंडक्टर मात्र वैतागला. त्या घटनेनंतर मुंबईत राहायचे तर मराठी भाषा शिकायची हा निश्चय अक्षयने केला आणि त्याने मराठी भाषा आत्मसात केली.
हिंदी चित्रपटांची निर्मिती करणे ही अक्षयसाठी नविन बाब राहिलेली नाही. मात्र, आता बॉलिवुडबरोबरच प्रादेशिक सिनेमाचा दर्जाही उंचावतो आहे, त्यालाही मोठा प्रेक्षकवर्ग मिळतोय, हे लक्षात घेऊन प्रादेशिक चित्रपटनिर्मितीत उतरण्याची अक्षयची महत्त्वाकांक्षा आहे. त्याचा श्रीगणेशा तो मराठी चित्रपटापासून करणार आहे. याशिवाय, ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाच्या सिक्वलची निर्मितीही अक्षय कुमारच करणार आहे. परेश रावलचा ‘कांजीभाई’ ही लोकांसाठी एक आदर्श व्यक्तिरेखा ठरली आहे. त्यामुळे कांजीभाईचा करिश्मा सिक्वलमध्येही यावा, अशी त्याची इच्छा आहे.

First Published on November 22, 2012 9:29 am

Web Title: akshay interested in making marathi film