एकिकडे वरिष्ठ नेते विधानसभा निवडणूक आघाडी आणि महायुती करूनच लढविली जाण्याचे स्पष्ट करीत असताना दुसरीकडे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्याने जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत. आघाडी आणि महायुती होणार असताना मग प्रत्येक मतदारसंघासाठी सर्वच पक्षांकडून मुलाखतींद्वारे इच्छुकांची चाचपणी करण्याचे नाटक कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आघाडी, महायुतीचे नेते घोषणा आणि कृती यांमध्ये गल्लत करीत असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी या महिन्याच्या उत्तरार्धात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राषट्रवादी यांच्यात आघाडी होईल किंवा नाही याबाबत अनिश्चिततेचे वातावरण होते. कारण अगदी कालपर्यंत दोन्ही पक्षांचे राज्यस्तरीय नेते स्वबळाच्या डरकाळ्या फोडत होते. त्या दृष्टिकोनातून उत्तर महाराष्ट्रात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अलीकडे केलेल्या दौऱ्यात जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले होते.
नाशिक येथे सहा आणि सात ऑगस्ट या दोन दिवशी राषट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. सद्य:स्थितीत जे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत त्या मतदारसंघांसाठीही राष्ट्रवादीच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या. इकडे इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विधानसभा निवडणूक आघाडी करूनच लढविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणुकीसाठी आघाडी होणार असताना सर्व मतदारसंघांसाठी मुलाखती घेण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.
राषट्रवादीप्रमाणेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही हाच प्रश्न सतावीत आहे. लोकसभा निवडणुकीत स्वप्नवत यश मिळाल्याने भाजपकडे इच्छुकांचा ओढा सध्या सर्वाधिक आहे. भाजपच्या वतीने नाशिकसह धुळे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात सद्य:स्थितीत शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांचाही समावेश आहे. भाजपकडून जिल्हा स्तरावर मुलाखती घेण्यात येत असताना राज्यस्तरावर महायुतीच्या कवचाखाली निवडणूक लढविण्याचे नेत्यांनी जाहीर केले आहे. जागावाटपसंदर्भात भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची प्राथमिक बैठकही पार पडली आहे. महायुतीच्या वतीने निवडणूक लढण्याचे निश्चित असतानाही प्रत्येक मतदारसंघासाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेणे सुरू असल्याने कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. जे मुलाखतीसाठी उपस्थित राहतील त्यांनाच उमेदवारीची संधी
देण्याचे भाजपकडून याआधीच जाहीर करण्यात आले असल्याने उत्तर महाराषट्रात भाजपच्या विद्यमान आमदारांनीही मुलाखती दिल्या असून त्यात सटाण्यातून उमाजी बोरसे, शिंदखेडय़ातून जयकुमार रावल यांचा समावेश आहे. आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची घोषणा वेगळी आणि कृती वेगळी या प्रकाराने कार्यकर्ते आणि इच्छुकांची अवस्था अधिकच दोलायमान झाली आहे.