कळवा-मुंब्य्रातील आव्हाडपंथी राजकारणाला धक्का देण्यासाठी शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते यंदा एकवटले असून जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्र्यातील एकगठ्ठा मतांना सुरुंग लावण्यासाठी काँग्रेससह वेगवेगळ्या पक्षांनी मुंब्य्रातून मुस्लीम ऊमेदवारांना रिंगणात उतरवत आव्हाडांना कात्रजचा घाट दाखविण्याची तयारी सुरू केली आहे. आघाडीची बोलणी फिस्कटताच काँग्रेस आणि समाजवादी पक्षात एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्यामुळे कळवा-मुंब्रा समाजवादी पक्षासाठी सोडला जावा, यासाठी राष्ट्रवादीतील एक मोठा गट सक्रिय झाला होता. मात्र या मांडवली राजकारणाला नकार देत काँग्रेसने यासिन कुरेशी या मुंब््रयातील ज्येष्ठ नगरसेवकाला िरगणात उतरवत आव्हाडांची डोकेदुखी वाढवली आहे. विशेष म्हणजे, ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने येथून अश्रफ मुलाणी यांना उमेदवारी जाहीर केली असून हादेखील याच व्यूहरचनेचा भाग असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सपाटून मार खात असताना आव्हाडांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीला सुमारे १२ हजारांचे मताधिक्य मिळाले. यामध्ये अर्थातच मुंब््रयातील २७ हजारांच्या मताधिक्याचा वाटा मोठा होता. कळव्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. तरीही शिवसेनेने येथून १५ हजारांचे मताधिक्य मिळवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आव्हाडांचे मुंब््रयातील मताधिक्य कमी व्हावे यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेने या मतदारसंघातून खारीगाव पट्टय़ातील ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत आलेल्या पाटील यांच्याविरोधात या भागातील निष्ठावंतांचा एक मोठा गट नाराज आहे. असे असले तरी आव्हाडांना ही निवडणूक सोपी ठरू नये यासाठी सर्वपक्षीय नेते कामाला लागले आहे.
मुंब््रयातील मुस्लीमबहुल पट्टय़ात शिवसेनेला मतदान होत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे आघाडी आणि युती या सरळ लढतीत आव्हाडांना मुंब््रयातून मोठे मताधिक्य मिळते. यंदा आघाडी तुटल्याने मुंब््रयातील आव्हाड विरोधकांना चेव चढला असून या भागातून तब्बल १२ मुस्लीम उमेदवार उभे करत त्यांच्या मतांची रसद रोखण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
ठाणे महापालिकेमार्फत मुंब््रयात होणारी विकासकामे सावरकरनगर पट्टय़ातील काही ठरावीक ठेकेदारांना दिली जातात, असे मुंब््रयातील एका मोठय़ा गटाचे म्हणणे आहे. मुंब््रयातील काही ठरावीक नगरसेवकांचे लाड पुरविले जात असल्याने राष्ट्रवादीतील नगरसेवकांचा एक मोठा गट त्यामुळे नाराज असल्याचे बोलले जाते. एमआयएम पक्षाचे ओवेसी यांना मुंब््रयात पाचारण करून त्यांची जंगी सभा घडवून आणण्यासाठी रौफ लाला या मुंब््रयातील नगरसेवकाने मध्यंतरी पुढाकार घेतला होता.  याच भागातील आव्हाडांचे कट्टर विरोधक राजन किणे यांनी आव्हाडपंथी राजकारणाला विरोध करत विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला असून यासिन कुरेशी यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर करून आव्हाडांना धक्का देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कुरेशी यांच्यासह एमआयएम पक्षातून अश्रफ मुलाणी, बहुजन समाज पक्षातून अब्दुल मन्सूर, याशिवाय शाहीन लियाकत अली, अहमद शेख अशा उमेदवारांची फौज उतरवत आव्हाडांना घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
दुसरीकडे अशोक भोईर (भाजप) आणि महेश साळवी (मनसे) हे कळव्यातील उमेदवार िरगणात उतरल्याने शिवसेनेपुढेही मतविभाजनाचा धोका कायम आहे. याविषयी आव्हाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. काँग्रेसचे राजन किणे यांनीही मोबाइलवर उत्तर दिले नाही.