शहर विकासाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेत गंगापूररोडवरील टपरीधारकांचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्यात येईल, असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.
शहरातील गंगापूररोडवरील टपरी धारकांनी आ. वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी बापू शिंदे, रमेश जाधव, सुभाष कोथमिरे आदी उपस्थित होते. ३५ वर्षांपासून गंगापूररोड येथे मारिया भिंतीलगत टपरीधारक व्यवसाय करीत आहेत. महानगरपालिकेने जवाहर योजनेंतर्गत ५० लोखंडी टपऱ्या येथील व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिल्या. परंतु रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाने या टपरीधारकांना नोटीस बजावली आहे. यामुळे सुमारे ४५० ते ५०० कुटुंबियांवर उपासमीरीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे हे शहरात आल्याची संधी साधत टपरी धारकांनी त्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यावेळी टपरी धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल. परंतु शहराच्या विकासाला बाधा पोहचणार नाही याची काळजी घेण्याची सूचना ठाकरे यांनी केली.