शहरातील आडगाव शिवारातील श्रीरामनगर भागात गुरूवारी मध्यरात्री अज्ञात टोळक्याने रुग्णवाहिका व चारचाकी मोटारींची तोडफोड केली. ही वाहने माहिती अधिकार कार्यकर्त्यांची असून काही वादग्रस्त प्रकरणे बाहेर काढल्यामुळे हा हल्ला झाल्याची शंका त्याने व्यक्त केली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
नाशिक शहरात वाहनांची तोडफोड व जाळपोळ हे प्रकार काही नवीन नाहीत. पोलीस यंत्रणा कार्यप्रवण झाल्यानंतर मागील काही महिन्यात त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले होते. तथापि, या घटनेने पुन्हा तास छेद दिला आहे.
गुरूवारी रात्री जत्रा हॉटेलच्या मागील बाजुस असणाऱ्या श्रीरामनगरमध्ये ही घटना घडली. पुर्वक रो-हाऊस येथे नितीन सातपुते हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या दोन रुग्णवाहिका आणि इनोव्हा मोटार घराबाहेर उभ्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास संशयितांनी या मोटारींची तोडफोड केली. त्यात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
 तोडफोड करून संशयित पसार झाले. ही बाब लक्षात आल्यावर सातपुते यांनी आडगाव पोलिसांशी संपर्क साधला. माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपण काही वादग्रस्त प्रकरणे बाहेर काढली होती, असे सातपुते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामुळे आपणास जिवाशी भीती होती. पोलीस संरक्षण मिळावे म्हणून काही महिन्यांपूर्वी आपण अर्जही दिला होता. परंतु, आजतागायत असे संरक्षण मिळाले नसल्याची तक्रार त्यांनी केली. त्यातच, घराबाहेर उभ्या असणाऱ्या रुग्णवाहिका व मोटारीची तोडफोड करण्यात आली.
 या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काही वर्षांपूर्वी शहरात मोटारींचे तोडफोड वा जाळपोळीचे सत्र सुरू होते. पोलीस यंत्रणेने कारवाईचे सत्र आरंभिल्यानंतर हे प्रकार आटोक्यात आल्याचे दिसत असताना हा प्रकार घडल्याने स्थानिकांमध्येही दहशतीचे वातावरण पसरले आहे.