येवला शहरात भारत संचार निगमची भ्रमणध्वनी सेवा सुरळीत करावी, या मागणीसाठी दूरसंचार सल्लागार समिती सदस्य, युवा सेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तीन तास येथील उपमंडळ अभियंत्यांच्या कक्षात ठिय्या दिला. भ्रमणध्वनी सेवेशी संबंधित समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरात ‘बीएसएनएल’च्या भ्रमणध्वनी सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला असून त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. भ्रमणध्वनीवर पुरेशी ‘रेंज’ मिळत नसल्याने मनोऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. तथापि, त्या दृष्टिकोनातून कंपनीमार्फत कोणतीही कार्यवाही होत नाही. चार महिन्यांपासून ग्राहकांनी वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. या पाश्र्वभूमीवर दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य मनोज दिवटे, युवा सेनेचे रूपेश लोणारी, मनसेचे गौरव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपमंडळ अभियंता अविनाश पाटील यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहर व ग्रामीण भागातील ग्राहक निगमच्या चुकीच्या नियोजनामुळे त्रस्त झाले आहेत. याआधीच्या दोन मनोऱ्यांविषयी तक्रारी आहेत. या आंदोलनाची माहिती समजल्यानंतर खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बीएसएनएलकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात युवा मोर्चाचे राम बडोदे, कुणाल क्षीरसागर, मनसे विद्यार्थी सेनेचे विजय निकम, तालुका संघटक नकुल घागरे आदी उपस्थित होते.