शहरात एकमेव असलेल्या रामाळा तलावाच्या काठावर ग्रीन प्लॅनेट सोसायटीने वसुंधरा दिन साजरा करून लोकांना रामाळा तलाव वाचवण्याचे आवाहन केले आहे. वसुंधरा दिनानिमित्त रामाळा तलावाच्या काठावर एकदिवसीय सहविचार सभा आयोजित ग्रीन प्लॅनेट सोसायटी या पर्यावरण संस्थेने आयोजित केली होती. या सहविचार सभेला शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवून यापुढे रामाळा तलाव वाचवण्यासाठी नगर प्रशासन, जिल्हा प्रशासन व राज्य शासनापर्यंत प्रयत्न करण्याचे ठरवले.
शहरातील लेंढारा, गौरी, तुकूम, कोणेरी, घुटकाळा हे सर्व गोंडकालीन तलाव आता वेगवेगळ्या वार्डात बदलेले आहेत. एकमेव उरलेले रामाळा तलावही अतिक्रमण व प्रदूषणाचा बळी ठरत आहे. दरवर्षी एक दोन घरे बनत असल्याने हळूहळू संपूर्ण तलाव काही वर्षांत ‘रामाळा तलाव वार्डात’ बदलण्याची भीती ग्रीन प्लॅनेट सोसायटीने दर्शवली होती. याबाबत अनेक निवेदने, भेटी देऊनही नगर प्रशासन काही करत नसल्यामुळे आता शहरातील ही गोंडकालीन शान वाचावी म्हणून आता नागरिकच धडपड करीत आहेत.
या सभेत प्रयत्नांसाठी एका विविध संस्थांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या कृती समितीत ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, मासेमारी संघटना, रामाळा तलाव स्वीमिंग क्लब आदी संघटनेच्या सदस्यांचा समावेश आहे. या सभेत रामाळा तलावाला अतिक्रमणातून वाचवण्यासाठी रामाळा तलावाच्या जलनगर भागाकडून एक संरक्षण भिंत बांधवी, घाटांची देखभाल करावी, मोठे अतिक्रमण काढावे, मच्छीनाला परिसरात मलनिस्सारण केंद्राची स्थापना करावी, तलावातील गाळ काढावा आदी मागण्यांसाठी कृती समितीची स्थापन करण्यात आली. कार्यक्रमाला डॉ. गोपाल मुंधडा, प्रा. सुरेश चोपणे, डॉ. योगेश दुधपचारे, कृष्णाजी नागापुरे, मोहन हिराबाई हिरालाल, डॉ. पृथ्वीराज खिंची, किशोर जामदार, उद्धव डांगे, प्रा. टी.डी. कोसे, प्रकाश कामडे, प्रदीप उमरे, सुबोध कोसलकर, प्रा. कविता रायपूरकर, भाविक येरगुडे, प्रा. गजानन सपाट, मलक बशीर, शंकर तोकलवार, संतोष झा, राजेश येलेवार, चेतन तोकला, राजू मंचलवार, प्रा. जुगलकिशोर सोमानी, महेंद्र राळे, सचिन वझलवार उपस्थित होते.