मुंबईहून नागरकोईलकडे निघालेल्या नागरकोईल एक्स्प्रेसमध्ये दरोडेखोरांनी घुसून चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटले. सोलापूरनजीक अनगर येथे हा प्रकार घडला. सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सोलापूर भागातील रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मोहोळच्या अलीकडे अनगर येथे नागरकोईल एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी काही वेळ थांबली होती. त्याचा नेमका फायदा घेऊन दरोडेखोर रेल्वे इंजिनच्या पाठीमागे असलेल्या सर्वसाधारण डब्यात शिरले. वंदना वाघमारे, शिवाजी बलभीम सुरवसे, अ.गनी हुसेन शेख (रा. सोलापूर) व अन्य प्रवाशांना दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व बॅगा बळजबरीने हिसकावून घेतल्या. वंदना वाघमारे यांच्या गळय़ाला तलवार लावून दरोडेखोरांनी त्यांच्या गळय़ातील सोन्याचे गंठण व मणिमंगळसूत्र काढून घेतले.

तर शिवाजी सुरवसे यांनाही चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील चाळीस हजाराची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. अ.गनी शेख यांनाही लुटण्यात आले. शेख हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये कार्यरत आहेत. ते शासकीय कामासाठी पुण्यात गेले होते. त्यांच्याकडे शासकीय कागदपत्रे होती. दरोडेखोरांनी त्यांची शासकीय कागदपत्रे असलेली बॅगही पळवून नेली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात अन्य एक प्रवासी जखमी झाला. मात्र सोलापूर स्थानक आल्यानंतर या जखमी प्रवाशाने पोलिसात धाव न घेता स्वत:चे घर गाठणे पसंत केले. दरम्यान, सोलापूर रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेऊन कुर्डूवाडी रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.