प्रवाशांशी उद्दामपणे वागणाऱ्या, विनापरमिट रिक्षा चालविणाऱ्या चालकांविरोधात उपप्रादेशिक परिवहन विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. विष्णुनगर पोलिसांनी विना परमिट रिक्षा चालविणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्यास अटक केल्याने रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले, निलेश गायकवाड असे या चालकाचे नाव आहे. तो रेल्वेमध्ये सानपाडा विभागात फिटर म्हणून काम करतो. निलेशने एका अपंग असलेल्या परमिटधारकाची रिक्षा भाडय़ाने चालवायला घेतली होती. ही रिक्षा दहा वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आली आहे. या अपंगाला निलेश वर्षांकाठी काही ठराविक रक्कम देऊन त्या अपंगाची रिक्षा चालवित असे. या रिक्षेचा नंबर आहे एमएच-०५-एस-८६३८ आहे. या रिक्षेच्या परमीटची मुदत ऑगस्ट २०१२ मध्ये संपली आहे. परमिटधारकाने निलेशला आपली रिक्षा आता परत कर. मला यापुढे भाडय़ाने रिक्षा द्यायची नाही, असे सांगितल होते.
 निलेशने रिक्षेला नवीन रंगरूप देऊन सजविले. आरटीओ कार्यालयाबाहेरील प्रशांत चव्हाण यांना निलेशने गाठून आपल्याजवळील रिक्षा भंगारात न जाता तिचे नवीन परमिट कसे निघेल याचा सल्ला घेतला. चव्हाणने जाफर नावाच्या गॅरेजवाल्याला हाताशी धरून त्याच्याकडील एक भंगार झालेली रिक्षा आरटीओ कार्यालयासमोर आणून ती अपंग परमीट होल्डरची रिक्षा समजून तोडून टाकली. अपंग परमिटधारकाला निलेश विनापरमिट आपली रिक्षा चालवित असल्याचे समजल्यावर त्याने विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांना लेखी कळविले. पोलिसांनी निलेशला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे याप्रकरणाचा तपास करीत आहेत.