अशोक सहकारी साखर कारखान्याने उसाच्या दुसऱ्या हप्त्याची १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे सुमारे साडेसहा कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे अशी माहिती अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी दिली. मात्र ही रक्कम मंगळवारनंतर मिळणार असल्याने शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. के. पाटील व तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी केली आहे.
अशोकच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिवाळीपूर्वी साखर कारखान्यांनी उसाचे पैसे द्यावेत असे आवाहन साखर कारखान्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देऊन सूत्रधार भानुदास मुरकुटे यांनी दिवाळीपूर्वी २०१२-१३ च्या गळीत हंगामात गळीतास आलेल्या उसाला १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देय असलेली साडेसहा कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. यापूर्वी २ हजार १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे रक्कम देण्यात आलेली आहे. आता त्यात आणखी १०० रुपयांची भर घालण्यात आली असे अध्यक्ष गलांडे यांनी सांगितले.
दुसऱ्या हप्त्याची रक्कम आज शनिवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतकी खात्यामार्फत मंगळवार, दि. ५ रोजी उसाची बिले घरपोहोच होतील. त्यानंतर शेतकऱ्यांना बँकेतून रक्कम उपलब्ध होईल असे गलांडे यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते पाटील व गुजर यांनी उसाचे पैसे दिवाळीनंतर दिले त्याबद्दल टीका करणारे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, अशोकचा कारभार हा अतिशय चांगला असल्याची टीमकी मुरकुटे वाजवतात. पण त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागत आहे. त्यांनी दिवाळीपूर्वी पेमेंट का दिले नाही, याचे उत्तर सभासदांना द्यावे. कारखान्याने अनेक वर्षांपासून दुसरा हप्ता देणे बंद केलेले आहे, खोडकीचे पैसे देत नाहीत. पवार यांनी आदेश देऊनही त्यांनी दिवाळीपूर्वी पैसे अदा केले नाही. संगमनेरने २ हजार ८११, कोळपेवाडी व संजीवनीने २ हजार ७११, मुळा व ज्ञानेश्वरने २ हजार ४००, विखेने २ हजार ४०० रुपये उसाला भाव दिला असून पैसेही मिळाले आहेत. पण अशोकने २ हजार ४०० रुपये भाव जाहीर करूनही दिवाळीपूर्वी पैसे दिलेले नाही, हा संशोधनाचा विषय आहे. मुरकुटे यांनी त्यांच्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होण्यासाठी पाटपाण्याच्या मोर्चाचे नाटक केले असा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे.