खासगी टॅक्सींविरोधात पुकारण्यात आलेल्या रिक्षांच्या संपामुळे सकाळी घाईघाईत कार्यालयात निघालेल्या हजारो नोकरदरांना फटका बसला. शेअर रिक्षांची सेवाही बंद असल्याने बसच्या रांगा वाढल्या होत्या. शाळेतील विद्यार्थ्यांना पोहोचवणाऱ्या रिक्षांची सेवा मात्र सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांची मात्र सुटका झाली.
उबर आणि ओला या खासगी टॅक्सींवर बंदी आणण्याच्या प्रमुख मागणीसाठी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन युनियनने बुधवारी संप पुकारला होता. या संपात सुमारे सत्तर टक्के रिक्षा सहभागी झाल्याने मुंबईकरांची पर्यायी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. बसच्या रांगेत घामेजून उभे राहण्यापेक्षा रिक्षाचा पर्याय स्वीकारणाऱ्या अनेकांच्या दिवसाची सुरुवात खराब झाली. रेल्वेस्थानक दूर असलेल्यांच्या मदतीला बेस्ट उपक्रम धावून आला. दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील विविध मार्गावर बेस्टने १०९ जादा बस सोडल्या होत्या. लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, अंधेरी अशा स्थानकांबाहेरही प्रवाशांची मोठी रांग होती. बाहेरून आलेल्या प्रवाशांनाही या संपाचा मनस्ताप झाला.
या संपात शिवसेना सहभागी झाली नसल्याने सेनेचे वर्चस्व असलेल्या भागात रिक्षा सुरू होत्या. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सकाळी पश्चिम उपनगरांत आणि दुपारी पूर्व उपनगरांत पाहणी केली. प्रवाशांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या, तसेच संपात सहभागी न झालेल्या संघटनांना जास्त सेवा चालवण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली हजारो रिक्षाचालकांनी वांद्रे येथील परिवहन आयुक्तालयासमोर मोर्चा काढला होता. या वेळी राव यांनी परिवहन आयुक्तांची भेट घेत मागणीपत्र सादर केले.