News Flash

निकृष्ट अंतर्गत रस्ते आणि दुर्गंधीचे नाले

शहरातील मोक्याच्या ठिकाणी केवळ वरकरणी चकाचक दिसणारे रस्ते, ‘नाला व्हिजन’च्या नावाखाली पावसाळी नाले, गटारे यांची केलेली स्वच्छता, त्यातून कंत्राटदारांचे खिसे भरण्याची प्रवृत्ती हे नवी मुंबईचे

| April 17, 2015 07:32 am

शहरातील मोक्याच्या ठिकाणी केवळ वरकरणी चकाचक दिसणारे रस्ते, ‘नाला व्हिजन’च्या नावाखाली पावसाळी नाले, गटारे यांची केलेली स्वच्छता, त्यातून कंत्राटदारांचे खिसे भरण्याची प्रवृत्ती हे नवी मुंबईचे एकीकडे चित्र दिसत असताना गाव, गावठाण, झोपडपट्टी भागांत झालेली रस्त्याची चाळण, जागोजागी तुंबलेली गटारे, पावसाळी नाल्यात प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्या हे दुसरे चित्र आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अर्धी जनता आजही समस्यांअभावी हालअपेष्टा सोसत आहे.
नवी मुंबई पालिकेने रस्ते, पदपथ, गटारे यांच्यावर गेल्या वीस वर्षांत दहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. शहरातील ४५५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची डागडुजी करताना केवळ मोक्याच्या व मोठय़ा कंत्राट असणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सध्या ४२ किलोमीटर रस्त्याचे केवळ डांबरीकरण करण्यात येत असून काही ठिकाणी हे डांबरीकरण फक्त कंत्राटदारांचे चांगभले करण्यासाठी असल्याचे दिसून येते. रस्त्याबरोबरच नाले व गटारांवर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे रस्ते आणि गटारे नव्याने बनविण्याची आवश्यकता नसून ती सिडकोने तयार करून दिलेली आहेत तरीही या सुविधांवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. शहरात ४५० किलोमीटर लांबीच्या गटारांच्या दुरुस्तीच्या नावाखाली स्लॅब तोडण्याचे काम सुरू असते. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उघडे नाले, गायब झाकणे हीच स्थिती कायम दिसून येते. रस्त्यांची स्थिती शहरात अनेक ठिकाणी चांगली असली तरी झोपडपट्टी परिसर व गावठाणामध्ये रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील तुभ्रे व दिघा येथे रस्त्यांची कामे तेथील झोपडय़ांच्या समस्येमुळे रखडलेली असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते. ऐरोलीमधील सेक्टर २० ते पटनी कंपनीपर्यंतच्या रस्त्यावरील गतिरोधकांना सफेद पट्टे मारण्यात आलेले नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात घडतात. रामनगर येथील प्रवेशद्वारापासून रबाले येथील एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. महापे, तुभ्रे, रबाले या एमआयडीसी परिसरांतील रस्त्यांच्या अपूर्ण कामामुळे रस्त्यावर धुळीचे लोट उसळत आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली ते कोपरखरणेपर्यंतच्या सव्‍‌र्हिस रोडवर कंपनीधारकांनी खासगी वाहने पार्किंग केली जात असल्यामुळे हा सव्‍‌र्हिस रोड नेमका कोणासाठी, असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. तुभ्रे केकेआर रोड येथील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. एपीएमसी परिसरातील सर्वच रस्त्यांवर सिग्नलजवळ खड्डेमय रस्ते असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. परिणामी या मुख्य रस्त्यावर जीवघेण्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. घणसोली गावामधील खाडीकिनारी परिसरातील अंतर्गत असणाऱ्या रस्त्यावर अद्यापपर्यंत डांबरीकरण करण्यात न आल्यामुळे कच्चे रस्ते आहेत.
डोंगर भागामधून निघून खाडीकिनारीपर्यंत असणाऱ्या दिघा, ऐरोली, कोपरखरणे, घणसोली, नेरुळ, बेलापूर येथील मुख्य नाल्यांमध्ये दरवर्षी पावसाळय़ाच्या सुरुवातीलाचनालेसफाई करण्यात येते. मात्र वर्षभर या नाल्यांकडे पालिका दुर्लक्ष करत असल्यामुळे या नाल्यांमध्ये सोडण्यात येत असलेल्या रसायनमिश्रित सांडपाणी व मलनिस्सारण पाणी यामुळे या नाल्यामधून दरुगधी येते. दिघा, बोनकोडे, कोपरखरणे, घणसोली, कोपरी, तुर्भे, शिरवणे, जुईनगर या परिसरांतील छोटय़ामोठय़ा गटारांमधील स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. बोनकोडे, कोपरखरणे, खरणे गाव, कोपरी गाव, तुभ्रे सेक्टर २१, २२ शिरवणे, जुईनगर, करावे गाव, औद्योगिक वसाहतीमध्ये नाल्यांची संख्या सर्वाधिक ९२ असून या नाल्यातील पाणी प्रक्रिया न करता खाडीमध्ये सोडले जात आहे. पालिकेने ४०० कोटी रुपये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी खर्च केले आहेत; पण अनेक ठिकाणी गटारातील दरुगधी नागरिकांना सहन करावी लागत आहे. शहराच्या पश्चिम बाजूस असलेला खाडीकिनारा दूषित पाण्यामुळे प्रदूषित होत आहे. माथाडी वसाहतीअंतर्गत अत्यंत अरुंद नाले असल्यामुळे सांडपाणी या नाल्याबाहेर वाहून येते. या नाल्यांची रुंदी आजतागायत वाढवण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी जोडनाले सखल पातळीवर न बनविता खाली-वर झाल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार सर्रासपणे आढळून येतात. कोपरखरणे सेक्टर ५ ते ८ या ठिकाणी अशा तक्रारी प्रामुख्याने आढळून येतात. याच प्रकारच्या तक्रारी बोनकोडे गाव, कोपरी गाव, वाशी गाव या ठिकाणीदेखील आढळून येतात. उघडे नाले वेळोवेळी साफ करण्यात येत नाहीत. त्याचप्रमाणे फवारणी वेळेत होत नसल्यामुळे मच्छरांचा व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2015 7:32 am

Web Title: bad road and sanitation facility in navi mumbai
Next Stories
1 सातबारा: नवी मुंबई महापालिका निवडणूक
2 मतदारांना ‘एसी’
3 युतीतील बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला संजीवनी?
Just Now!
X