मांढरदेव येथील काळूबाई देवी व सुरूर येथील दावजीबुवा यात्रा कालावधीत प्रशासनातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापली कामे चोख करून दारूबंदी, वाद्यबंदी व पशुहत्याबंदीचे काटेकोरपणे पालन करावे. भाविकांना सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने, यात्रा सुव्यवस्थितपणे व सुरळीत पार पाडण्याकामी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सूरज वाघमारे यांनी केले.
मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीची यात्रा व सुरूर येथील दावजीबुवा यात्रा  २७,२८ व २९ जानेवारी रोजी होत असून त्यानिमित्ताने आढावा घेण्यासाठी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती; या वेळी ते बोलत होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव धस, आपत्ती व्यवस्थापनचे प्रकल्प अधिकारी देविदास तामाडे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक सचिन बुरूड, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. एम. देशमुख, एस.टी. महामंडळाचे पुण्याचे विभाग नियंत्रक अशोक जाधव, वाईचे तहसीलदार सुनील चंदनशिवे, भोरचे तहसीलदार रामचंद्र चोबे, खंडाळाचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे, डी. एस. बी. शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जोशी, वाईचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे आदी उपस्थित होते.
वाघमारे म्हणाले,‘‘सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी यात्रा कालावधीत व पुढील एक महिना मंगळवार, शुक्रवार, रविवार, अमावस्या व पौर्णिमेस चोख बंदोबस्त ठेवावा. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे व चालू मोबाईल नंबर प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व वाई पोलीस ठाण्यात देऊन सर्व कर्मचारी ठरलेली कामे योग्य पध्दतीने करतात याची खात्री करून घ्यावी. वाईच्या तहसीलदारांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून योग्य प्रकारे काम करून घ्यावे. मांढरदेव परिसरात आरोग्य विभागाची चोख व्यवस्था ठेवण्यात यावी. सर्व कर्मचाऱ्यांना व स्वयंसेवकांना ओळखपत्रे देण्यात येणार असल्याचेही,’’ ते म्हणाले.
उपविभागीय पोलीस अधिकारी धस म्हणाले,‘‘यात्रेच्यानिमित्ताने सर्व विभागांनी जे कर्मचारी व अधिकारी नेमले आहेत. ते दोन पाळीमध्ये नेमावेत. तसेच यात्रेच्या मुख्य तीन दिवसात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी स्वत: जातीने उपस्थित राहून यात्रा सुरळीत पार पाडण्याकामी सहकार्य करावे.’’
याशिवाय विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी यात्रेनिमित्ताने केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यात राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक एस. आर. पाटील, साथीच्या रोगाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. डी. कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सकचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एल. जगदाळे, पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. एच. टी. रावटे, वाईचे गटविकास अधिकारी एस. एल. गायकवाड, भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. सावंत, पर्यटन विकास महामंडळाचे कनिष्ठ अभियंता दीपक हरणे, वाई पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव, भोरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. जी. मलाजुरे, मांढरदेवचे सरपंच काळूराम क्षीरसागर, मांढरदेव ट्रस्टचे विश्वस्त सतीश मांढरे, मारूती मांढरे, सोमनाथ क्षीरसागर, सुनिल मांढरे, सचिव लक्ष्मण चोपडे, सहसचिव गेणु हेरकळ, अनिरुध्द अॅकॅडमीचे शरद महामुनी, राजीव बागुल, सतीश फुले, डॉ. संजय कनुजे, चंद्रकांत पोळ, आर. एच. कुलकर्णी, वाईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंदराव भोसले, गट शिक्षणाधिकारी हणमंतराव जाधव, उपअभियंता रामदास माने, पत्रकार शिवाजीराव जगताप आदींनी अहवाल व सूचना सादर केल्या.
श्रीफळ फोडणे, तेल वाहण्यावर बंदी
यात्रा कालावधीत श्रीफळ फोडणे, तेल वाहणे, वाद्य वाजविणे, पशुहत्येस बंदी घालण्यात आली असून याचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जागोजागी पथके नेमण्यात येणार आहेत. आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिकेची सोय, पुरेसा औषध साठा उपलब्ध करणे, ब्लड बँकेची माहिती अद्ययावत ठेवणे, खासगी हॉस्पीटलमध्ये बेड राखीव ठेवणे, ठिकठिकाणी डॉक्टरांची पथके तयार करून भाविकांना सेवा देण्यात येणार आहे. मांढरदेव ग्रामपंचायतीच्यावतीने पंधरा ग्रामसेवकांचे पथक तयार करून पोलिसांच्या सहकार्याने फेरीवाले व इतर अतिक्रमणे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्त्री-पुरूष भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात तात्पुरती शौचालये उभारली जाणार आहेत. गटर, कचराकुंडया व तात्पुरती शौचालये या ठिकाणी पावडर फवारणी करण्यात येणार आहे. स्वच्छ पाणी पुरवठयासाठी टीसीएल पावडर व तुरटीची सोय करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने तीन टँकरची सोय करण्यात येणार आहे. पालिकेतर्फे गणपती घाट परिसर स्वच्छ ठेवून दिवाबत्तीची सोय करण्यात येणार आहे. मांढरदेवकडे जाणारे रस्त्यातील खड्डे बुजवून, अडथळे दूर करण्यात येणार आहेत. वाई शहरातून मांढरदेवकडे जाण्या-येणाऱ्या मार्गाची एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.
पशुहत्या रोखण्यासाठी पशू संवर्धन खात्यामार्फत चार पथकांची नेमणूक करण्यात आली असून दक्षता घेण्यात येणार आहे. मात्र यासाठी भाविकांच्यात प्रबोधन होणे गरजेचे आहे. पुणे, भोर, वाई व मांढरदेव येथून भाविकांची ने-आण करण्यासाठी आवश्यक तेवढया सुस्थितीतील एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे वाई-मांढरदेव रस्त्याचे खड्डे भरणे, साईडपट्टया व्यवस्थित करण्यात येणार आहेत. अनिरु ध्द डिझास्टर मॅनेजमेंटचे तीनशे स्वयंसेवक दोन शिफ्टमध्ये सेवा करणार आहेत.
गट शिक्षणाधिकारी यांच्यातर्फे मांढरदेव, कोचळेवाडी, बालेघर, धावडी येथील प्राथमिक शाळेच्या खोल्यांमध्ये निवासासाठी लाईट व पाण्याची सोय करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्याच्यावतीने यात्रा कालावधीत सर्व आवश्यक ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. देवस्थान ट्रस्टच्यावतीने स्पिकर, मंडप, पार्किंग, बॅरेगेटींग, कर्मचाऱ्यांची भोजन व्यवस्था, हायस्कूल, प्राथमिक शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था, सर्व खात्यांच्या पथकांसाठी जागा, साफसफाई कामगार नेमणे, पिण्याच्या पाण्याची सोय, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था करणे, अपंग, वयोवृध्द भाविकांची दर्शनाची सोय आदी कामे करण्यात येणार आहेत. ट्रस्टने मंदिरातील व मंदिर परिसरातील वीज वाहिन्यांची तपासणी करुन घ्यावी. पोलीस निरीक्षक यांच्याकडून जागा निश्चित करून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने यात्रा कालावधीत दारूबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
मांगीरबाबा, गोंजीरबाबाचे पुजारी वानखेडे यांनी यात्रा कालावधीत श्रीफ़ळ वाढविण्यास व पशुहत्येस भाविकांना परवानगी देण्यात यावी, तसेच मांगीरबाबा व गोंजीरबाबाच्या दर्शनाची सोय करण्यात यावी अशी सूचना केली. त्यावर प्रांताधिकारी वाघमारे म्हणाले, कोचर आयोगाच्या सूचनेप्रमाणे श्रीफळ फोडण्यास व पशुहत्येस बंदी घालण्यात आली आहे. तसेच मांगीरबाबा व गोंजीरबाबाचे दर्शन घेण्यासंदर्भात ट्रस्टचे विश्वस्त, पोलीस निरीक्षक व पुजारी यांनी एकत्र बसून योग्य निर्णय घ्यावा असे सांगितले.
प्रारंभी, वाईचे तहसीलदार सुनील चंदनशिवे यांनी मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक व आभार मानले.