राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींच्या ‘संग्राम’ केंद्रांमधून बँकांचे व्यवहार सुरू करण्यात येणार असून, राज्य शासनाने यासंदर्भात २७ राष्ट्रीयीकृत बँकांशी करार केलेला आहे, असे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी अंबड येथे सांगितले. अशाप्रकारे राज्यातील ३०० गावांमधील ‘संग्राम’ केंद्रांमध्ये बँकांची ही सेवा सुरू झालेली आहे, असेही ते म्हणाले.
अंबड येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेश टोपे व प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान उपस्थित होत्या. या वेळी पाटील म्हणाले, की २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये संगणकीय सेवा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या केंद्रातून ग्रामस्थांना आता पैसे भरता येतील. त्याचप्रमाणे काढता येतील आणि आपल्या खात्यावर किती रक्कम जमा आहे, याची माहिती होऊ शकेल. तसेच या केंद्रांच्या माध्यमातून बचतगटाच्या उत्पादनाचे मार्केटिंगही केले जाणार आहे. या केंद्रांमधून सध्या विविध १९ प्रकारची प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. विविध करांची वसुली झाली तर गावाचा विकास चांगल्याप्रकारे होऊ शकेल. सरपंचांचा मानधनाचा निर्णय राज्य शासन लवकरच घेणार असून, यापूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न सोडवण्यात येईल. या संदर्भातील प्रस्ताव तयार असून लवकरच त्यास मान्यता मिळेल.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजनेंतर्गत मोठय़ा प्रमाणार निधी मिळवता येऊ शकतो. सरपंच व ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अंबड तालुक्यातील १११ गावांपैकी केवळ २० गावे या योजनेंतर्गत तिसऱ्या वर्षांत पोहोचलेली आहेत. मागील वर्षांतील दुष्काळामुळे ही संख्या कमी झालेली असू शकेल. परंतु या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या गावांची संख्या वाढली पाहिजे. अंबड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण  ५६ टक्के तर घरपट्टी वसुलीचे प्रमाण ५४ टक्के आहे. तिसऱ्या वर्षी हे प्रमाण १०० टक्के असले पाहिजे, असेही पाटील म्हणाले. पालकमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान यांची भाषणे या वेळी झाली. आमदार चंद्रकांत दानवे, आमदार संजय वाघचौरे, पंचायत समितीचे सभापती अनिता पैठणे, माजी खासदार अंकुशराव टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन आदींची उपस्थिती या वेळी होती. तत्पूर्वी बदनापूर येथील पंचायत समिती कार्यालयास ग्रामविकासमंत्री पाटील यांनी भेट देऊन, अधिकारी-कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी बदनापूर पंचायत समिती कार्यालयातील फर्निचर खरेदीसाठी ८२ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.