येथील नगर परिषदेत ९ फेब्रुवारीला भाजप-सेना सत्तारूढ झाल्यानंतर विकासाची कामे बाजूला सारून १० महिन्यांच्या कालावधीत नगराध्यक्षांनी धोरणात्मक निर्णय डावलून नगर परिषद सभागृहाला विश्वासात न घेता संजय मंडल यांना येथील औद्योगिक क्षेत्रात बीअरबार शॉपी लावण्यास नाहरकत प्रमाणपत्र दिले. हे प्रकरण राजकीय वर्तुळात गांभीर्याने चर्चिले जात असल्याने हे प्रकरण राष्ट्रवादी व काँग्रेसचे धनराज देवके, रामराव कुबडे, विजय धरवाळ, छाया अढाऊ या विरोधी नगरसेवकांनी न्यायालयात दाखल केल्याने ते नगराध्यक्षांच्या अंगलट येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बीअर शॉपीचे प्रकरण अंगलट येणार असल्याचे नगराध्यक्षांच्या लक्षात येताच त्यांनी या नगरसेवकांवर आरोप करणे सुरू केले आहे. या विरोधी नगरसेवकांनी ६ नोव्हेंबरला माझे लेटर पॅड चोरून त्यावर माझी बोगस स्वाक्षरी केली व जिल्हाधिकाऱ्यांकडे माझा राजीनामा पाठवला, असा आरोप नगराध्यक्षांनी केला आहे. त्यापुढे नगराध्यक्षांनी १५ नोव्हेंबरला सदर पोलिसात धनराज देवके यांच्याविरोधात लेटर पॅड चोरल्याचा संशय घेऊन तक्रारही दाखल केली. नगराध्यक्षांनी लावलेले सर्व आरोप निराधार व माथेफिरूपणाचे असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी याविरोधात विरोधी नगरसेवकांनी २० नोव्हेंबरला एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. धनराज देवके येथील नगर परिषदेत २००२ पासून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. २००७ ते २०११ या काळात ते पालिकेत उपाध्यक्ष होते. त्यांना कायद्याची जाणीव असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा स्वत: जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष उपस्थित राहून सादर करावा लागतो. त्यामुळे आम्ही नगरसेवक असा पोरखेळ कसा करू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
येथील नगरपालिकेत १० महिन्यांपासून भाजप-सेनेची सत्ता आहे. विकासाच्या खोटय़ा बोंबा मारत असून प्रत्यक्षात तत्कालीन राष्ट्रवादी व काँग्रेस राजवटीतील विकासाची कामे सुरूच असल्यामुळे भाजप-सेना आपले अपयश लावण्यासाठी जनतेची दिशाभूल करणारे खोडसाळ वृत्त पसरवित असतात. नगर परिषदेतील तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालावधीत १३ ऑक्टोबर २००८ ठरावानुसार येथील वस्तीत असलेली दारूची दुकाने व बीअरबार शहराबाहेर हलवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता, परंतु या भाजप-सेना सत्तारूढ गटाने या प्रकरणाला तिलांजली देऊन न.प. पत्र क्र. २४४/२०१२ दि. २२/८/१२ रोजी रहिवासी जागेवर सव्‍‌र्हे क्र. ६३६ साजा क्र. २७ येथे बीअरबार व वाईन शॉप सुरू करण्याची परवानगी देण्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र दिले. या निर्णयामुळे सत्तारूढ गटासह सर्वच नगरसेवक आम्हाला विश्वासात न घेतल्याची माहिती देत आहेत. विशेष बाब म्हणजे, २१ जून २०१२ च्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर बीअरबारच्या नाहरकत प्रमाणपत्र संदर्भात विषय नसतानाही अध्यक्षांनी हा विषय सभागृहाला अंधारात ठेवून लिहून घेतला. याच संदर्भात मोहपा येथील हरी गुंडगे यांनी बीअरबार परवानगीसाठी अर्ज केला असता त्यांचा अर्ज न.प. पत्र क्र. २७५/२०१२ दि. २७ जूनला धोरणात्मक बाब असल्याची सबब पुढे करून त्यांचे प्रकरण फेटाळले. त्याचप्रमाणे तहसीलदारांनी बीअर शॉपीबाबत नगर परिषदेला अहवाल सादर केल्याचे पत्र दिले असता २९ मार्चला तहसीलदारांना धोरणात्मक बाबींचे कारण पुढे करून अहवाल सादर केला, हे विशेष.