मुंबई विद्यापीठाचा बहिशाल शिक्षण विभाग, इन्स्टुसेन ट्रस्ट, एम. एफ. मक्की आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या सहकार्याने मुंबईकरांसाठी नाताळच्या सुटीसाठी खास भेट एका प्रदर्शनाच्या रूपाने येत आहे. ‘दि रॉक्स, मिनेरल्स आणि फॉसिल्स’ हे प्रदर्शन विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात भरणार असून नानाविध आकाराची आणि रंगीबेरंगी दगड पाहायला मिळणार आहेत.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ एम. एफ. मक्की यांच्याकडील विविध मनमोहक खडक, रंगीबेरंगी खनिजयुक्त खडक आणि डेक्कन महाविद्यालयाकडे संग्रही असलेले आता अस्तित्वात नसलेल्या प्राचीन प्राण्यांचे, वनस्पतींचे जीवाश्म या प्रदर्शनात पाहता येतील.
याच प्रदर्शनात एक मोठा अशनीचा अवशेषही पहायला मिळेल. अंधारात चमकणाऱ्या खनिजांचा अनुभव मिळेल. पृथ्वीच्या कवचावरील काही चोरकप्प्यांत सापडलेल्या रत्नखचित दगडांचे प्रचंड मोठे नमुने पहायला मिळतील. माणसाने आपल्या संरक्षणासाठी, निर्वाहासाठी प्रथम वापरली ते दगड आणि दगडी अवजारे अशी अश्मयुगीन हत्यारेही प्रदर्शनात मांडली जातील. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात २६ ते २८ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहील.
या प्रदर्शनात भूशास्त्र, जीवाश्मशास्त्र या विषयांतील तज्ज्ञ त्यांच्या विद्यार्थ्यांसह उपस्थित असतील आणि प्रत्येक नमुन्याची माहिती इंग्रजी व मराठीत लिहिलेली असेल.
प्रा. डॉ. विजय साठे यांचे ‘महाराष्ट्रातील जीवाश्म’ या विषयावरील व्याख्यान २७ डिसेंबरला सायंकाळी आयोजित करण्यात आले आहे. भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली असून विजेत्यांनी पारितोषिकेही असतील. विभागाचे हे तिसरे भूशास्त्रीय प्रदर्शन आहे.