News Flash

गणेशोत्सवात पोलिसांपुढे गुन्हे रोखण्याचे आव्हान

शहरात दोन-तीन महिन्यांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था ठेवणे हे पोलिसांसमोरील आव्हान मानले जात आहे. अपुऱ्या पोलीस बळास सहाय्य व्हावे म्हणून

| August 29, 2014 01:04 am

शहरात दोन-तीन महिन्यांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था ठेवणे हे पोलिसांसमोरील आव्हान मानले जात आहे. अपुऱ्या पोलीस बळास सहाय्य व्हावे म्हणून पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले असले तरी सर्वानाच ते शक्य नसल्याने मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षक म्हणून नेमण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे.
साहेबराव पाटील, गणेश शिंदे यांसारखे सहाय्युक आयुक्त तसेच उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळल्याचे दिसून आले. हे कमी म्हणून की काय सिडको व सातपूर परिसरास त्रस्त करून सोडणाऱ्या टिप्पर गँगचे कंबरडे मोडणारे डी. एस. स्वामी यांच्यासारख्या अधिकाऱ्याचीही आता बदली झाल्याने गुन्हेगारांना निश्चितच हायसे वाटले असणार. त्यातच पोलीस आयुक्तांनी पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या नियोजनावर अधिक लक्ष देणे सुरू केल्याने दोन-तीन महिन्यांपासून शहरात पुन्हा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. पोलिसांचे भय वाटेनासे झाल्याने भरदिवसा लुटमारीच्या घटना घडू लागल्या आहेत. पंधरवाडय़ापूर्वी नाशिकरोड येथे सराफी दुकानदारावर गोळीबार करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न असो किंवा याच आठवडय़ात बँकेतून पैसे घेऊन बाहेर पडणाऱ्या ग्राहकांकडून पैसे हिसकावून फरार होण्याचे प्रकार असो, या घटनांमुळे नागरिक भयभीत झाल्याचे तर गुन्हेगारांची हिंमत वाढल्याचे दिसून येते. पावसाळ्यापूर्वी सोनसाखळी हिसकावून मोटारसायकलवरून धूम ठोकण्याचे प्रकार भलतेच वाढले होते. परंतु पावसाळ्यास सुरूवात झाल्यानंतर हे प्रकार एकदमच कमी झाले. अर्थात त्यासाठी पोलिसांनी महापालिकेच्या कारभाराला धन्यवाद देण्याची गरज आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली असून खड्डय़ांमुळे वाहन चालविणे एक कसरतच झाली आहे. त्यामुळे अशा खड्डेमय रस्त्यावरून मोटारसायकल सूसाट सोडत फरार होणे शक्य नसल्याने सोनसाखळी चोरीच्या प्रकारांना काहीसा आळा बसला आहे.
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर जुन्या नाशिकमध्ये पोलिसांनी संभाव्य अनूचित घटना किती त्वरेने रोखता येईल याचे प्रात्यक्षिक मागील आठवडय़ात केले. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा लाभ उठवित होणारे अनूचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांना मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही साथ लागणार आहे. प्रत्येक मंडळाचे शेकडो कार्यकर्ते वर्गणी मागण्यासाठी फिरत असतात. कार्यकर्त्यांची हीच जंत्री मंडळांनी सुरक्षारक्षक म्हणून वापरल्यास पोलिसांवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:04 am

Web Title: big challenge in front of police to maintain peace in city
टॅग : Loksatta
Next Stories
1 सेवानिवृत्त कामगारांचा मोर्चा
2 जलप्रदूषण टाळण्यासाठी सलग सातव्या वर्षी ऊर्जा निर्माल्य पिशव्यांचे वाटप
3 जिल्हा रुग्णालयासमोरील गाळ्यांचे कवित्व सुरुच
Just Now!
X