महाराष्ट्रासमोर सध्या केवळ स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा एवढीच समस्या नसून पाण्याच्या उपलब्धतेचेही मोठे संकट उभे आहे. अशा प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी ‘इंडियन वॉटर वर्क्‍स असोसिएशनच्या’ अधिवेशनात तज्ज्ञांनी सादर केलेल्या अभ्यासपूर्ण कल्पना व उपायांचा नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले.
अल्पबचत भवन येथे ‘इंडियन वॉटर वर्क्‍स असोसिएशनच्या’ ४५ व्या वार्षिक अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी देशमुख बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. कल्याणकर, मावळते अध्यक्ष आर. एन. गुप्ता, सेक्रेटरी जनरल कोमल प्रसाद, असोसिएशनचे पुण्याचे अध्यक्ष बी. डी. यमगार, संयोजक सचिव दयानंद पारसे हे यावेळी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘‘शहरी व ग्रामीण भागात स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची समस्या महाराष्ट्राला भेडसावत आहे.
 इचलकरंजीमध्ये दूषित पाण्यामुळे २० जणांना विविध आजार झाल्याची घटना ताजी आहे. त्याबरोबरच यंदा पाण्याच्या उपलब्धतेचे संकट महाराष्ट्रासमोर उभे राहिले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी ५ मीटरने खालावली आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणामध्ये मागच्या वर्षांमध्ये ४० टीएमसी इतका पाणीसाठा होता. यंदा तो कवळ १ टीएमसी एवढा आहे. उजनीतून २५ लाख लोकांची पाण्याची गरज भागविली जाते. यंदा ही एक समस्या महाराष्ट्र शासन व जल प्राधिकरणासमोर आहे. या सर्व समस्येवर पाणी वाया जाऊ न देता जास्तीत जास्त लोकांना पाणी पुरवठा कसा करता येईल, याचा विचार केला पाहिजे. पाणी पुरवठा कसा करावा या बाबत शासन काळजीत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत रेल्वेने पाणी पुरवठा केला नाही. मात्र यंदा मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत अशा प्रकारे रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडियन वॉटर वर्क्‍स असोसिएशनच्या अधिवेशनात ४८ तांत्रिक पेपर तसेच पाण्याच्या समस्येवर चर्चा होऊन अनेकांनी आपल्या कल्पना मांडल्या. त्या नक्कीच पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपयोगी पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कल्याणकर म्हणाले, स्वच्छ, शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा कसा करता येईल याबाबत या अधिवेशनात विचारांची  देवाण-घेवाण होऊन चर्चा झाली. शासनाने धोरण ठरविताना या उपाय आणि सूचना विचारात घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी.
अधिवेशनामध्ये उत्कृष्ट पेपर सादर केलेल्या सदस्यांचा बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला.