केवळ मित्रांच्या मौजमस्तीसाठी रोज नवीन वाहने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरातील विविध भागातून दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या एका टोळीच्या सूत्रधारासह दोघांना पाचपावली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या टोळीचा सूत्रधार रोहित खोब्रागडे, सुरज विश्वकर्मा, आणि संतोष धकाते अशी आरोपींची नावे आहे. सर्व आरोपी विशी-पंचविशीतील तरुण आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरात गेल्या दोन महिन्यात १०० पेक्षा अधिक दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यामध्ये आहे. वाहने चोरून जाण्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी या घटनांचा पर्दाफाश करण्याचे आदेश दिले. पाचपावली परिसरातून दोन दिवसांपूर्वी एक वाहन चोरल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी काही काही संशयित युवकांवर लक्ष केंद्रित केले होते. वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा सूत्रधार सूरज विश्वकर्मा याच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. परंतु, त्याचे साथीदार रोहित खोब्रागडे आणि संतोष धकाते यांची कुंडली पोलिसांनी बाहेर काढली. संतोष हा सीताबर्डी भागात व्यवसाय करतो तर रोहित हा मोलमजुरीचे काम करतो. हे दोघेही सूरजचे मित्र असल्यामुळे त्याच्या आदेशाने दुचाकी वाहने चोरण्याचे काम करीत होते. रोहितवर चोरी आणि खंडणीचे अनेक गुन्हे आहेत.
पोलिसांचा संशय संतोषवर असल्यामुळे प्रथम त्यालाच ताब्यात घेतले त्यानंतर रोहीत आणि सर्वात शेवटी सूरजला त्यांच्या धम्मदीप नगरातील राहत्या घरून ताब्यात घेतले. या तिघांनी गाडय़ा चोरून नेत असल्याचे कबूल केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त मंगलजित सिरम यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस आयुक्त बाबा डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले, उपनिरीक्षक एम.एस. पाटील, अनिल ठाकूर, राजमोहन ठाकूर, दीपक कारोकर लक्ष्मीकांत बारलिंगे यांनी ही कारवाई केली.   

अशी होती चोरीची कार्यप्रणाली
तिन्ही तरुण नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालय, सीताबर्डी परिसरातून गाडय़ा चोरून नेत असत. नागपूर सुधार प्रन्याच्या कार्यालयाबाहेर रोहित उभा राहत असे. एखाद्या व्यक्तीने पार्किंगच्या ठिकाणी गाडी न ठेवता कार्यालयासमोर ठेवून तो आत गेला की त्याच्या मागे सूरज जात होता. त्या व्यक्तीला वेळ लागत असेल किंवा तो कुठल्या अधिकाऱ्याकडे बसला असेल तर रोहितला मोबाईलवरून माहिती देत होता. त्या व्यक्तीला वेळ लागत असेल तर रोहित ‘मास्टर की’ ने मोटारसायकल कुलुप उघडून ती चोरून नेत असे. रोहित हा संतोषला बोलावून त्यांच्याकडे गाडी सोपवत पुन्हा नासुप्रच्या कार्यालयासमोर येत होता. या टोळीने नासुप्र कार्यालय परिसरातून सातपेक्षा अधिक दुचाकी वाहने चोरून नेल्याचे निष्पन्न  झाले आहे. सीताबर्डी भागातून सहा ते सात गाडय़ा चोरून नेल्याचे रोहितने सांगितले. त्यांच्या राहत्या घरातून तसेच गोंदिया, भंडारासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमधून पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या आहेत.