सुतार पक्ष्याचे घरटे कसे असते? फ्लेमिंगोचे अग्निपंख कसे दिसतात? बगळा आपले भक्ष्य कसे पकडतो? निसर्गभ्रमणातूनच मिळू शकणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे बसल्या जागेवर देणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन चितळे रस्त्यावर जिल्हा वाचनालयाशेजारी सुरवी आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात शेती करत असताना वेळात वेळ काढून परिसर भ्रमंती करत छायाचित्रकलेची जोपासना करणाऱ्या ज्ञानेश्वर कातकडे या युवकाने ही छायाचित्रे टिपली आहेत. त्यात काय नाही? चिमण्या, पोपट, मैना यासारख्या पक्ष्यांबरोबरच तांबट, सुगरण, बुलबूल अशा शहरवासियांसाठी दुर्मिळ असणाऱ्या पक्ष्यांची ही छायाचित्रे आहेत. जायकवाडी धरणावर येणाऱ्या फ्लेमिंगो या परदेशी पाहुण्यांनाही ज्ञानेश्वरने त्यांच्या विविध अदांमध्ये टिपले आहे.
माजी आमदार राजीव राजळे यांच्या हस्ते परवा (शनिवारी) सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. महिनाभर हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ९ या वेळात सर्वासाठी विनामुल्य खुले राहील.